कोणतेही मंदीर म्हटले की तेथे पुजारी असलाच पहिजे अशी आपली समजूत आहे. पुजाऱ्याविना मंदिरे अगदी क्वचितच असतात आणि ती बहुतेकवेळा ओसाड प्रदेशात किंवा माळरानावर असतात. तेथे भाविकांची गर्दी नसते. तथापि, भारतातील छतरपूर या प्रसिद्ध जिल्ह्यात गौरीहार या स्थानी एक हनुमान मंदीर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्या असे की हे नेहमीसारखे तीन किंवा चार भिंतीचे बांधीव मंदीर नाही. येथील भगवान हनुमानच्या मूर्तीचा आकारही नेहमीसारखा नाही. तसेच या देवस्थानात पुजारी किंवा पुरोहितही नाहीत. तरीही येथे प्रतिदिन भक्तांची मोठी रांग लागलेली असते. हजारो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे.
या मंदिराच्या परिसरात लोक राहतात. त्यांची घरे येथे आहेत. तथापि, या लोकांपैकी कोणीही या मारुतीचे पुजारी नाहीत. या मारुतीची नित्य पूजा येथे येणारे भाविकच त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करतात. येथील भगवान हनुमानाची मूर्ती शेकडो वर्षांपासूनची आहे, अशी माहिती गावकरी देतात. तथापि, या मूर्तीच्या आणि मंदिराच्या इतिहासाविषयी अधिक माहिती उपलब्ध नाही. मात्र, येथील भगवान हनुमान अतियश लोकप्रिय आहेत. आसपाच्या जिल्ह्यांमधून तसेच भारतभरातून येथे भाविक येतात. हे जागृत देवस्थान मानले जात आहे.
हे मंदीर म्हणजे एक विशाल खडक आहे. या खडकावर भगवान हनुमानच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कित्येक शतकांपूर्वी करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत या खडकावरील मारुतीचे स्पष्ट दर्शन होत होते. तथापि, काही दशकांपूर्वी या भागात आग लागली आणि त्या आगीत या मूर्तीचे मूळचे स्वरुप नाहीसे झाले. तरीही येथे मोठ्या श्रद्धेने मारुती भक्त येतात. हा भगवान हनुमान स्वयंभू आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. ही भगवान हनुमानाची ‘आदिशक्ती’ स्वरुपातील मूर्ती आहे असे मानले जाते. या मूर्तीच्या दर्शनासाठी प्रतिदिन हजारो भक्तांची रांग लागलेले असते. या मंदिराचे कोणतेही व्यवस्थापन नसतानाही अत्यंत शिस्तीत भाविकच या मंदिरांच रखरखाव करतात, अशी माहिती गावकरी देतात.









