जगप्रसिद्ध तीर्थस्थळ वाराणसी येथे शरीरस्वास्थ्याची देवता धन्वंतरीचे मंदिर आहे. हे धन्वंतरीचे भारतातील एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते. याचे वैशिष्टय़ असे की हे वर्षातून एकदाच धनत्रयोदशी दिवशी उघडते. पहाटे मंदिर उघडल्यानंतर पुरोहित धन्वंतरीची षोडपशोपचारे पूजा करतात. विविध पक्वान्नांचा नैवेद्य धन्वंतरीला दाखविला जातो. ही पक्वान्नेदेखील उत्कृष्ट शरीरस्वास्थ्यासाठी अनुकूल अशाच प्रकारची असतात. वर्षातून केवळ एक दिवस धन्वंतरीचे दर्शन घडत असल्यामुळे या दिवशी येथे भक्तांची संख्या प्रचंड असते. इतकी की त्यांची रांग दुसऱया दिवसापर्यंतही राहते. वाराणसीतील नागरिक या मंदिरात जाऊन दर्शन घेण्यासाठी धनत्रयोदशीची जणू वाट बघत असतात.

नियमानुनसार धन्वंतरीचे दर्शन धनत्रयोदशी दिवशी केवळ पाच तास दिले जाते. पण हा नियम भक्तांची प्रचंड संख्या पाहता काही वेळा शिथिल केला जातो. धनत्रयोदशी हा धन्वंतरीचाच सण आहे. या मंदिरातील धन्वंतरीची मूर्ती अष्टधातूंची असून ती 325 वर्षे जुनी असावी, असे मानले जाते. धनत्रयोदशी दिवशी पूजा करण्याचे उत्तरदायित्व येथील शास्त्राr कुटुंबावर इतिहासकाळापासून आहे. या घराण्याची बारावी पिढी आज हे उत्तरदायित्व पार पाडत आहे.









