विद्यार्थ्याने दिली जीवे मारण्याची धमकी
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने स्वतःच्या शिक्षिकेला निर्दयी मारहाण केली आहे. सर्वप्रथम या विद्यार्थ्याने शिक्षिकेला धक्का देत खाली पाडले, मग तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. तसेच या शिक्षिकेला त्याने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. जखमी शिक्षिकेला रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
संबंधित विद्यार्थी वर्गात व्हिडिओ गेम खेळत होता. यामुळे शिक्षिकेने त्याच्याकडी निंटोडो स्विच (गेम) काढून घेतला होता. यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्याने शिक्षिकेला मारहाण केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विद्यार्थ्याला अटक केली आहे. तर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फ्लोरिडाच्या मातनजस हायस्कुलमध्ये ही घटना 21 फेब्रुवारी रोजी घडली आहे. येथील एका शिक्षिकेने वर्गात व्हिडिओ गेम खेळत असलेल्या विद्यार्थ्याचा गेम काढून घेतला होता. यामुळे संतप्त विद्यार्थी शिक्षिकेच्या मागे धावून जात तिला खाली पाडले. जमिनीवर पडल्यावर ही शिक्षिका बेशुद्ध झाली होती. ती बेशुद्ध असतानाही विद्यार्थ्याने तिला बेदम मारहाण केली आहे. यादरम्यान अन्य शिक्षक बचावासाठी धावले. या विद्यार्थ्याने संबंधित शिक्षिकेवर थुंकल्याचेही समोर आले आहे.
17 वर्षीय विद्यार्थ्याची उंची 7 फूट 6 इंच असून त्याचे वजन सुमारे 122 किलोग्रॅम इतके आहे. त्याने निर्दयीपणे शिक्षिकेवर हल्ला केला आहे. आम्ही घटनास्थळी पोहोचल्यावर ही शिक्षिका रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडलेली होती. विद्यार्थ्याला आम्ही ताब्यात घेतल्यावरही त्याचे वर्तन भीतीदायक होते असे पोलीस अधिकारी रिक स्टाली यांनी सांगितले आहे.









