अज्ञातावर फसवणुकीचा गुन्हा
मिरज प्रतिनिधी
कुरियर कंपनीतून बोलत असल्याचे सांगून एका भामट्याने ऑनलाईन ॲपद्वारे शिक्षिकेला एक लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी श्रीमती कल्पना सुखदेव जाधव (वय 45, रा. श्रीराम अपार्टमेंट, शनिवार पेठ, मिरज) यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन फोन आला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने आपण कुरियर कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. कुरियर इनव्हाईस ॲपवरुन मेसेज पाठविला. त्याखाली एक लिंक देऊन त्यावर पाच रुपये पाठविण्यास सांगितले. संबंधिताच्या सांगण्यानुसार जाधव यांनी पाच ऊपये पाठविले.
त्यानंतर काही वेळातच जाधव यांच्याच बँक खात्यावरुन पहिल्यांदा 97 हजार आणि त्यानंतर अडीच हजार असे एक लाख रुपये काढल्याचा मॅसेज आला. संबंधित कुरियर कंपनीच्या कर्मचाऱ्यानेच बोगस ॲपद्वारे बँक खात्यावर ऑनलाईन डल्ला मारल्याचे दिसून येताच शिक्षिका जाधव यांनी शहर पोलिसात धाव घेऊन फसवणुकीची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलिसांच्या सायबर विभागाकडून करण्यात येत आहे.