A teacher missing for six days finally appeared before the police
सहा दिवसापासून बेपत्ता झालेले कलंबिस्त हायस्कूलचे शिक्षक राजेश पाटकर, रा. भटवाडी सावंतवाडी हे रविवारी पहाटे आंबोली येथील पोलीस दूरक्षेत्रात हजर झाले, अशी माहिती पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली. दोन जानेवारीला सावंतवाडी येथून कलंबिस्त हायस्कूलला जातो असे घरात सांगून राजेश पाटकर हे बेपत्ता झाले होते. याबाबतची तक्रार पत्नीने पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानी आपला मोबाईल व दुचाकी घरी ठेवल्याने पोलिसांना शोध लावण्यात मोठे आव्हान होते. नातेवाईक व पोलीस शोध घेत होते. परंतु शोध न लागण्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत होते. अखेर रविवारी पहाटे बेपत्ता शिक्षक पाटकर हे आंबोली पोलिस दूरक्षेत्रात हजर झाले. त्याना सावंतवाडी पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे. त्याच्या जबाबानंतर बेपत्ताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली.
सावंतवाडी / प्रतिनिधी









