अध्याय पंचविसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा, अहंकार आणि देहबुद्धी यामुळे, माणसाच्या सगळं मलाच हवं अशा विचारसरणीने सत्व, रज, तम ह्या तीन गुणांचा खूपच विस्तार होतो. त्यामुळे संसारवृक्ष खालीवर चांगलाच फोफावतो. तो कापून टाकल्याशिवाय निर्गुण होताच येत नाही. तो छेदण्याचा प्रकार ऐक, जीवाला योनी किंवा गती त्या त्या गुणकर्मानुसार मिळतात. जो जीव चित्तात उत्पन्न होणाऱया काम, क्रोध, लोभ, मोहादी विकारांवर विजय मिळवतो, भक्तियोगाने माझ्यामध्ये नि÷ा ठेवतो तो माझे स्वरूप प्राप्त करून घेतो परंतु असे होण्यात अडचण कुठे येते ते समजून घे. सत्वादी तिन्ही गुण, शुद्ध असोत की एकमेकात मिसळलेले असोत, ते पुरुषाला कर्म करायला भाग पाडून फळाच्या आशेत गुंतवतात आणि पाप पुण्याच्या बंधनात अडकवून बद्ध करून संसारी जीव बनवतात. प्रत्यक्षात जीव हा मुक्त असतो पण फळाच्या आशेत गुंतून पडल्याने त्याला स्वतःला तो बद्ध आहे असे वाटते. तीन गुणांचे जे कर्माचरण आहे, तेच शुद्ध ब्रह्माला जीवपणा आणते. म्हणून जीवाला पडलेले बंधन तोडण्याकरिता भगवद्भजन करावे. त्यासाठी सद्गुरूला शरण जावे. सद्गुरू हे माझेच रूप आहेत हे ध्यानात घेऊन सद्गुरूचे भजन केले असता अत्यंत शुद्ध असा सत्त्वगुण वाढतो. गुरुभजनावर जे विश्वास ठेवतात, त्यांच्या चारही मुक्ती दासी होतात. सद्गुरू म्हणजेच मी अशी ज्याची दृढ भावना असते, त्याच्या सेवेला ब्रह्मभावनाही येत असते. ब्रह्मभावनेबरोबरच मी देवाधिदेव अंतर्बाह्य ति÷त उभा असतो. जो अनन्यभावाने गुरुचरणाला शरण जातो, तो सहज ब्रह्मस्वरूप होतो. म्हणून शहाण्या माणसांनी तत्त्वज्ञान आणि साक्षात्कार यांची प्राप्ती करून देणारे, अत्यंत दुर्मिळ असे हे मनुष्यशरीर मिळाल्यावर, गुणांनी कितीही भुरळ घातली, मोहात पाडण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना बळी न पडता, माझे भजन करावे. मनुष्य देह दुर्मिळ आहे हे मी तुला सांगितलेलं आहेच. देवसुद्धा मनुष्यदेह मिळावा म्हणून धडपडत असतात कारण देवयोनी ही केवळ भोगयोनी आहे. उद्धार व्हायचा असेल तर मनुष्यदेहाशिवाय होत नाही हे लक्षात घेऊन मनुष्यदेहाच्या प्राप्तीसाठी ते तळमळत असतात आणि त्यासाठी मनापासून उत्कंठित असतात. म्हणून थोर असा हा मनुष्यदेह प्राप्त झाल्यावर इतर कोणत्याही गोष्टीच्या नादाला न लागता, अखंड ज्ञान संपादन करावं. अर्थातच ज्ञान संपादन करणं ही काही सोपी गोष्ट नाही कारण नरदेह प्राप्त झाला म्हणून ब्रह्मज्ञान हे काही आपोआप प्राप्त होत नाही. त्याकरता मी कर्ता आहे हा देहाभिमान सोडून माझेच भजन करावे लागते. मनुष्याचा स्वभाव सत्व, रज आणि तम गुणांनी युक्त आहे हे तुला माहित आहेच. सर्वसाधारण माणसांच्यात रज आणि तम गुण विपुल प्रमाणात असतात आणि त्यामानाने सत्वगुण कमी असतो. रजोगुण विलासी राहणीमान तर तमोगुण आळस, निद्रा इत्यादी सवयी माणसाला लावत असतो. त्यामुळे अशा व्यक्तीत अहंभाव ठासून भरलेला असतो. त्याला स्वतः पेक्षा कोणच मोठा वाटत नसतो पण सत्वगुण जरी कमी प्रमाणात असला तरी तो चांगल्या सवयींचा पुरस्कर्ता असतो. तो जीवाला माझ्या भजनात गुंतवण्याचा प्रयत्न करतो. ज्याप्रमाणात अनन्यभावाने केलेल्या माझ्या भजनाचा कालावधी वाढत जातो त्याप्रमाणात सत्त्वगुण वाढत जातो आणि आपोआपच रज, तम गुण कमी होत जातात. वाढलेल्या सत्त्वगुणापासून विवेकयुक्त ज्ञान उत्पन्न होते. या ज्ञानामुळे काय चांगले काय वाईट हे लक्षात येऊ लागते. समोर दिसणारी व्यक्ती, वस्तू व परिस्थिती जशी आहे तशी दिसू लागते. त्यामुळे त्यांची आपल्या मनावर भुरळ पडू शकत नाही. वस्तू आहे तशी दिसू लागली की, त्यानंतर घडणाऱया माझ्या भजनाला अभेदभजन असे म्हणतात. ते केले असता आत्मानंदाचा आस्वाद प्राप्त होतो आणि त्यालाच विज्ञान असे म्हणतात. आत्मानंदाचा आनंद प्राप्त झाला असता गुणांचे कार्यच संपते त्यामुळे तीनही गुण मिथ्या आहेत असे लक्षात येते कारण आता त्या साधकाच्या स्वभावात ते सारख्या प्रमाणात असल्याने निष्प्रभ झालेले असतात. लहान बालकाच्या स्वभावात निसर्गतःच तिन्ही गुण साम्यावस्थेत असतात. त्यामुळे त्याच्या मनात स्वार्थाचा लवलेशही नसतो तशीच अवस्था आत्मानंदाचा आस्वाद घेत असलेल्या साधकाची असते.
क्रमशः








