भारताचा आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीस जाण्यास नकार : भारताची कोंडी करणारा पाकिस्तान तोंडावर आपटणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बीसीसीआय ढाका येथे होणाऱ्या आशियाई परिषदेच्या वार्षिक बैठकीत सहभागी होणार नाही. बांगलादेशमधील सध्याची परिस्थिती पाहता, 24 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीला बोर्ड उपस्थित राहू शकत नाही. भारताने एसीसी अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) चे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना बैठकीचे ठिकाण बदलण्याची विनंती केली होती, परंतु त्याला अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. परिणामी बीसीसीआयने या बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला असून भारतासोबत आणखी तीन देशांनी हीच भूमिका स्वीकारली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतावर अनावश्यक दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. बीसीसीआयने स्पष्टपणे सांगितले आहे की जोपर्यंत बैठकीचे ठिकाण बदलले जात नाही तोपर्यंत आशिया कपबाबत कोणताही निर्णय घेता येणार नाही. अर्थात, भारत आणि बांगलादेशमधील तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
आशिया चषकाचे यजमानपद भारताकडे
यंदा भारत आशिया कपचे आयोजन करत आहे आणि ही स्पर्धा टी-20 स्वरुपात खेळवली जाईल. आतापर्यंत एसीसीने स्पर्धेचे वेळापत्रक किंवा ठिकाण जाहीर केलेले नाही, परंतु असे मानले जाते की तो सप्टेंबरमध्ये होऊ शकतो. 2023 मध्येही भारताने पाकिस्तानमध्ये आशिया कप खेळण्यास नकार दिला होता, त्यानंतर भारताचे सामने श्रीलंकेत झाले होते. या वर्षीही भारताचे पुरुष आणि महिला संघ आशिया कपमधून माघार घेऊ शकतात अशी अटकळ होती, परंतु बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी याबाबतचा निर्णय झालेला नसल्याचे सांगितले आहे.
तीन देशांचा पाठिंबा
श्रीलंका, ओमान आणि अफगाणिस्तानचे क्रिकेट बोर्डही भारतासोबत आहेत आणि त्यांनी ढाका येथील बैठकीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. बांगलादेशातील बिकट परिस्थिती पाहता एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी ढाका येथे बैठक घेण्यावर ठाम आहेत. विशेष म्हणजे, नक्वी यांनी ढाका येथे बैठक घेण्याचा आग्रह धरणे हे भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. बैठकीला फक्त 5 दिवस शिल्लक आहेत, परंतु अद्याप एसीसीकडून कोणतीही नवीन ठिकाणाची अधिकृत घोषणा झालेली नाही. यामुळे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या संभाव्य आशिया कपला धोका निर्माण झाला आहे.
आशिया कपवरच संकट?
आशिया कप सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे मात्र जर सध्याच्या घडामोडी अशाच सुरु राहिल्या, तर ही स्पर्धा स्थगित होण्याची किंवा रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बीसीसीआय हा एसीसीचा सर्वात महत्त्वाचा सदस्य आहे आणि त्यांच्याविना ही स्पर्धा अपूर्ण ठरू शकते. एकंदरीत, आगामी काही दिवस आशिया कपच्या भवितव्यावर निर्णायक ठरणार आहेत.









