पुणे / वार्ताहर :
पुणे पोलीस दलातील एका निलंबित पोलीस कर्मचाऱ्याने शेजारी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकास बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार कॅम्प परिसरातील एमजी रस्त्यावर घडला आहे.
याप्रकरणी अरफाज आरिफ शेख (वय 27) या निलंबित पोलीस कर्मचाऱ्यासह एका महिलेविरोधात लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमीर हनीफ पटेल (65) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. संबंधित घटना 17 मे रोजी घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अमीर पटेल हे त्यांच्या घरासमोरील अंगणात 17 मे रोजी सायंकाळी बसले होते. त्यावेळी पटेल यांच्या घरामागे राहणाऱ्या महिलेने त्यांना माझे फोटो का काढले?, तुम्हाला माझे फोटो काढण्याचा अधिकार कोणी दिला अशी विचारणा केली. यावेळी अरफाज शेख तिथे आला. त्याने मी पोलीस आहे, मी तुम्हाला सोडणार नाही, असे म्हणत लाकडी बांबुने अमीर पटेल आणि त्यांच्या मुलास बेदम मारहाण केली. याप्रकरणी आरोपी विरोधात लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस बनसुडे करत आहे.







