मनपा नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांचे मत
प्रतिनिधी/ पणजी
राजधानी पणजीत दरवर्षी निर्माण होणारी पूरस्थिती नियंत्रणात आणायची असेल तर शहरातील पोर्तुगीजकालीन पूर नियंत्रण व्यवस्थेचे सखोल सर्वेक्षण आणि अभ्यास होणे आवश्यक आहे, असे मत माजी महापौर तथा नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी व्यक्त केले आहे.
त्याचप्रमाणे सांडपाणी निचरा व्यवस्थेचेही संपूर्ण जाळे, पंपिंग स्टेशन आणि खास करून क्रॉस रोडवर त्यांची उंची प्रत्येकी 25 ते 50 मीटरवर नोंद करण्यासाठी दुसरे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे.
शहरातील जलवाहिन्यांच्या जाळ्यांचेही फेरसर्वेक्षण करणे आवश्यक आहे. त्याद्वारे या तिन्ही व्यवस्थांमध्ये कोणतीही गुंतागुंत असल्यास ती त्वरित दुऊस्त करून घेणे शक्य होणार आहे. या तिन्ही व्यवस्था प्रत्येकी 5 ते 10 मीटरवर उपयुक्त असणे गरजेचे असून हा व्यापक सराव केला तरच पूर व्यवस्था, सांडपाणी आणि पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्या यांच्यात समन्वय राहून त्या दूषित होण्याच्या घटना होणार नाहीत. तोच या वार्षिक संकटावर उत्तम उपाय ठरेल, असेही श्री. फुर्तादो यांनी पुढे म्हटले आहे.









