ज्येष्ठ नागरिक जेव्हा सहलीला जातात तेव्हा ते मनाने तरुण होतात. आनंदी, उत्साही, रंगीबेरंगी पोशाख घातलेली ही मंडळी देश-परदेश समरसून बघतात, अनुभवतात. पैसा आणि वेळ यांची सांगड घातल्याने त्यांच्या आयुष्यात असलेली रिकामी जागा एक नाते भरून काढते, ते म्हणजे काळजी घेत हक्क दाखवणाऱ्या उमद्या युवा नातवाचे. आजी-आजोबा हे नुसते बिरुद मिरवणाऱ्या नात्यात नातू आणि नात कुठेतरी दूर असतात. त्यांचा प्रेमळ सहवास हे एक दिवास्वप्न असते. सहलीत ते अचानक प्रकट होते आणि आजी-आजोबा हरखून जातात. टूर मॅनेजर हे पद भूषवणारा तरुण लाघवी आणि गोड गोड बोलणारा असतो. येताजाता आजी-आजोबा हे संबोधन आपलेपणाने वापरून तो सर्वांना खुश करतो. मनामनात उमलून येणारे हे असते रेडिमेड नाते. खरे सांगायचे तर मानस नाते. या नात्याला परंपरेची, बंधनाची, मशागतीची डोळ्यात तेल घालून रात्र-रात्र जागत काळजीने व्याकुळ होत उगवण्याची गरज नसते. ते टिकाऊ असावे असेही नाही. बहरले फुलले, मिटले. एखाद्या रानफुलासारखे. मंद सुगंध देत वाटेवरती हरवून जाणारे. रेडिमेड नाती जिकडेतिकडे ताटव्यांनी फुललेली असतात. नात्यांच्या गुंत्यांमधून ती हळूच निसटतात.
जन्माला आल्यापासून देहविसर्जनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत माणूस नात्यांचा गोफ विणत त्यातच अडकलेला असतो. जिवलगांच्या मृत्यूनंतरदेखील ही नाती मनात पक्के घर बांधून वास्तव्य करतात. कुणी एखादाच भाग्यवान असतो की ज्याला आयुष्याच्या वळणावर अकस्मात देहाचे आणि आत्म्याचे नाते उलगडते. तेव्हा लौकिकातल्या साऱ्याच नात्यांना पूर्णविराम लाभतो. प. पू. रामकृष्ण क्षीरसागर महाराज म्हणतात, ‘मनुष्य जन्माला येतो तेव्हा काय असते त्याच्या देहात? रक्त मांस मलमूत्र. जन्माला येताक्षणी जोडून असलेला धागा म्हणजे नाळ तुटते. या देहाच्या मूळ तारा जन्माला येताक्षणी कापतात. नंतर या देहामध्ये कुठलीही बटणे नाहीत. तारा नाहीत. हा देह उघडून बघितला तर काय दिसते? फक्त रक्त मांस मलमूत्र. परंतु यातच बुद्धिमत्ता आहे. चमत्कार, साक्षात्कार, वैराग्य, ज्ञान, दारिद्र्या, संपत्ती आणि दैव आहे. त्यात भगवंताची अगाध शक्ती असते. आईच्या उदरात एका एका पेशीपासून कुणी निर्माण केला हा देह? जगभरातल्या शास्त्रज्ञांना अजूनही मानवी देहाचे गूढ उकलले नाही. संत कबीर म्हणतात, ‘झिनी झिनी झिनी चदरिया..’ प्रत्येक देहकलाकृती नवी, वेगळी आणि सुंदर. संत कबीर पुढे म्हणतात, ‘साई को सियत मास दस लागे, ठोक ठोक के बिनी चदरिया.’ हा देह तयार करायला भगवंताला दहा महिने लागले. त्याने दिवसरात्र यासाठी काम केले. देहाचे आणि भगवंताचे असे विलक्षण नाते आहे. परंतु दुर्दैव असे की खोलवर आत असलेल्या या आदिम नात्याची ओळख पटण्यापूर्वीच माणसाचा देह पडतो.
देहातील भगवंताच्या नात्याची ओळख पटण्यासाठी जबाबदारी आणि बंधने स्वीकारावी लागतात. त्यासाठी संतमंडळींनी ‘विठ्ठल नामाचा रे टाहो’ केला. संसारातील सारी नाती ही संत तुकाराम महाराजांना आवडेनाशी झाली तेव्हा ते म्हणाले, ‘सर्वविशी माझा त्रासलासे जीव। आता कोण भाव निवडू एक?’ कुणी मला आपले म्हटले तरी मला ते आवडत नाही.
नाशिवंत प्रपंचातल्या खोटेपणाच्या गोष्टी आवडत नाहीत. ‘तुका म्हणे काही आणिक न साहे। आवडती पाय वैष्णवांचे?’ आत्म्याची काळोखी रात्र अनुभवल्यानंतर संत तुकाराम महाराजांना विठ्ठलाच्या आणि त्यांच्या चिरंजीव नात्याचा साक्षात्कार झाला आणि ते म्हणाले, ‘आनंदाचे डोही आनंद तरंग.’ जन्माला येताच अपरिहार्यपणे येऊन चिकटलेली जवळची, सख्खी, रक्ताची, दूरची नाती जोडून, जपून, सांभाळून संत एकनाथ महाराजांनी जन्मोजन्मीचे अभेद्य असे एक अनोखे नाते सांगितले ते म्हणजे ‘बाप आणि आई । माझी विठ्ठल रखुमाई । पुंडलीक राहे बंधू । त्याची ख्याती काय सांगू । माझी बहीण चंद्रभागा । करीतसे पापभंगा?’ संतांचे माहेर पंढरी आहे.
देहाचे आणि भगवंताचे नाते अलिप्त, स्वैर, न चिकटणारे असे नाही. ते रेडिमेड स्वरूपात लाभत नाही. त्यासाठी दृष्टी व्यापक असावी लागते. आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर म्हणतात, ‘देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी। देव चोरून नेईल, अशी कोणाची पुण्याई?’ देव अंतरात, दाही दिशांत, आभाळात, सागरात, चराचरात कोंदला आहे. देवाला शोधायला कुठे जावे लागत नाही. तो तर सर्वांभूती वसला आहे. देव मूर्तीमध्ये नामरूपाने आहे. तीर्थक्षेत्री भक्तांच्या तल्लीनतेने नाचण्यात आहे. ‘देव आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे। तुझ्यामाझ्या जड देही । देव भरुनिया राही?’ विश्वाचे कारण असलेला देव सगुण, निर्गुण असून तो अनंत, अगाध आहे. या गाण्याची शेवटची ओळ काळजामध्ये रुतून बसते. काळजातला दिवा प्रकाशित करते. ‘काळ येई, काळ जाई। देव आहे तैसा राही?’ जन्माला येणाऱ्या प्रत्येक जिवाचा तो शिल्पकार आहे. परंतु देहातच पुनर्जन्म होण्याचे भाग्य फक्त मनुष्यजन्मात आहे. विनासायास भगवंताशी रेडिमेड नाते जोडणारा भक्त अजून तरी जन्माला आलेला नाही. येणारही नाही
परमेश्वर मात्र कृपाळू, दयाळू आहे. तो भक्तांसाठी रेडिमेड नाते क्षणात निर्माण करतो. घोरकष्टोद्धरण स्तोत्रात प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी श्री दत्त प्रभूंना ‘सुकीर्ते’ असे संबोधतात. भक्तांवर कुठलेही संकट आले की एखाद्या नात्याचे रूप घेऊन दत्त महाराज हजर. श्री दत्त महाराजांची तशी कीर्ती आहे म्हणून ते ‘सुकीर्ते.’ अपघात झाला तर अचानक एखादे रिक्षेवाले काका धावून येत तात्काळ दवाखान्यात नेऊन प्राण वाचवतात. लग्नकार्यात आर्थिक उणीव भासली तर कुणीतरी मामा खिसा भरून देतो. विठुराया तर बहुरूपी आहे. महिपती ताहराबादकर यांनी संतचरित्रे लिहून महाराष्ट्रावर फार मोठे उपकार केले आहेत. महाराष्ट्र त्यांचा ऋणी आहे. संतचरित्र लिहून झाले की ते आपल्या गावाहून विठोबाला वाचून दाखवायला पंढरपूरला पायी जात. वाटेत एखाद्या घरी थांबून भोजन, विश्रांतीनंतर पुन्हा चालत. एकदा वाटेमध्ये एका घरी गृहलक्ष्मीने त्यांना फटकळपणे म्हटले, ‘आम्ही गरीब आहोत. तुम्हाला आमच्या घरी फक्त भाजीभाकरीच मिळेल.’ ते विठोबाला मनामध्ये म्हणाले, ‘तुझी मजा आहे रे विठुराया. तुला रोज राउळात पुरणपोळी पंचपक्वान मिळतं; पण आम्हाला काय तर कोंड्याची भाजी-भाकरी.’ आणि काय आश्चर्य! न सांगतासवरता अकस्मात त्या घरचे नवे जावई सासुरवाडीत येऊन उभे. मग काय, घरात पंचपक्वान्न झाले आणि जावईबापूंनी महिपतींनाच आग्रह करून करून खाऊ घातले. त्यांनी लिहिलेले संतचरित्र मोठ्या आवडीने ऐकले. वेशीपर्यंत त्यांना सोडायलाही आले आणि पुन्हा राउळी जाऊन कटीवर हात ठेवून उभे राहिले. ते आपले विठुराया. माणसांच्या रूपात नात्याचे रूप घेऊन येणारा परमेश्वर निरपेक्ष नाते मनावर ठसवतो. ते ओळखता आले तर अवघे जीवन अमृततुल्य होते.
-स्नेहा शिनखेडे








