पुणे / प्रतिनिधी :
एटीएसकडून अटक करण्यात आलेल्या ‘त्या’ चार दहशतवाद्यांच्या चौकशीत नवनवीन माहिती समोर येत आहे. दहशतवादी कारवाया करण्यासाठी संबंधित दहशतवाद्यांनी जगभरातील दहशतवादी संघटनांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केल्याचेही निष्पन्न झाले आहे.
या चौघांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. आता त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत आता 11 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.
दरम्यान सहायक पोलिस आयुक्त अरूण वायकर यांनी न्यायालयात सांगितले, की राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) महाराष्ट्र् मोडय़ुलप्रकरणी काही जणांना अटक केली. आरोपी हे एकमेकांच्या संपर्कात होते. या दहशतवाद्यांनी वेगवेगळी नावे धारण केली होती. त्यांनी बॉम्ब बनविण्याचे प्रात्यक्षिक सोबत मिळून केले. यात अनेकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे अटक करण्यात आलेल्या दशहतवाद्यांचे शिक्षण आणि त्यांना माहिती तंत्रज्ञानाचे असणारे ज्ञान हे जुळणारे नाही. त्यांच्या मागे कोणी तरी मोठे असण्याची शक्यता आहे.
आधारकार्ड दाखवून वस्तूंची खरेदी
देशात बंदी नसलेल्या मात्र निर्बंध असलेली काही रसायने, संवेदनशील पदार्थांची खरेदी ही दहशतवाद्यांनी केली आहे. अशा प्रकारच्या वस्तू खरेदी करताना आधार कार्ड देणे सक्तीचे असते. या आतंकवाद्यांनी आधारकार्ड दाखवून या वस्तू खरेदी केल्या.
दहशतवाद्यांकडे देशातील काही ठिकाणांचे नकाशे सापडले
अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून देशभरातील काही ठिकाणचे काही नकाशे जप्त करण्यात आले आहे. शनिवारी यातील एक नकाशा न्यायालयात सादर करण्यात आला होता. त्यात देशभरातील, कुठल्या ठिकाणी, कुठल्या शहरात घातपात करण्याची तयारी करण्यात येत होती, याची माहिती देण्यात आली होती.








