पणजीतील घटना, संशयिताला अटक
प्रतिनिधी /पणजी
ख्रिसमसच्या पार्टीसाठी पणजीत आलेल्या सांकवळ येथील एका नामांकित शिक्षणसंस्थेतील विद्यार्थिनीला मद्य पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत संशयिताच्या विरोधात महिला पोलीस स्थानकात पीडित युवतीने तक्रार दाखल केली असून संशयिताच्या विरोधात भादंसंच्या 376 कलमाखाली गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव चंद्रशेखर वासूदेव रमाणी (वय 35, झुवारीनगर) असे असून तो वाहनचालक आहे. लैंगिक अत्याचाराची घटना 25 रोजी संध्याकाळी 6 ते रात्री 11.41 दरम्यान घडली होती. युवती शुद्धीवर येताच तिने महिला पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
मद्यधुंद युवतीवर अत्याचार
काही विद्यार्थिनी जीए-06-टी-5376 क्रमांकाच्या टेम्पो ट्रव्हल्समधून ख्रिसमस पार्टीचा आनंद घेण्यासाठी पणजीत आल्या होत्या. पार्टी चांगलीच रंगल्यानंतर काही विद्यार्थिनी परत येऊन टेम्पोमध्ये बसल्या, त्यात पीडित विद्यार्थिनीही होती. ती मागच्या सिटवर बसली तर इतर विद्यार्थिनी पुढच्या सिटवर बसल्या व त्यांना झोप लागली होती. टेम्पोच्या बाहेर असलेल्या संशयिताने संधीचा फायदा घेऊन पीडित युवतीला मद्य पाजले. ओळखीची व्यक्ती असल्याने तिनेही मद्य घेण्यास संकोच केला नाही. मात्र काही वेळाने ती बेशुद्ध पडली आणि संशयिताने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
काही वेळाने ती शुद्धीवर आल्यानंतर तिने घडलेला प्रकार इतर विद्यार्थिनींना सांगितला आणि पोलिसांना बोलवून घेतले. दरम्यान संशयिताने घटनास्थळावरून पोबारा केला होता. पोलिसांनी तक्रार नोंद करून पीडित युवतीची वैद्यकीय तपासणी केली. संशयिताच्या विरोधात लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा नोंद करून त्याला अटकही केली आहे. महिला पोलीस स्थानकाच्या निरीक्षक संध्या गुप्ता पुढील तपास करीत आहेत.









