औपचारिक शिक्षणाचे महत्व जसजसे वाढले, तसे शिक्षण घेणाऱया मुलामुलींची संख्याही वाढू लागली आहे. आता तर शाळांमध्ये आपल्या मुलांना प्रवेश घेण्यासाठी पालकांची अक्षरशः झुंबड उडते. कित्येकदा घरापासून बऱयाच दूरवर असणाऱया शाळांमध्ये प्रवेश घेणे भाग पडते. अशावेळी मुलांना शाळेपर्यंत नेणे आणि परत आणणे पालकांना स्वतःला जमत नाही. मग खासगी रिक्षा किंवा इतर वाहनांची सोय करावी लागते. एका रिक्षात किंवा वाहनात अशी अनेक मुले नेली जातात. काहीवेळा मुले वाहनांमधून पडून अपघात होतात. काहीवेळा मुले वाहनाबाहेर हात काढतात आणि ओव्हरटेक करणाऱया वाहनांमुळे जखमी होतात.

मोठीं माणसेची अनवधानाने किंवा अज्ञानाने असे करतात. बस किंवा वाहनाबाहेर चूळ थुंकण्यासाठी किंवा अन्य कारणांसाठी डोके बाहेर काढले जाते. अशावेळी बाजूने दुसरे वाहन जात असेल तर मोठा अपघात होण्याची शक्यता असते. या धोक्यापासून वाचण्यासाठी राजस्थानातील नागौर जिल्हय़ातील इडवा गावाची रहिवासी असणाऱया ऊर्मि डेगाना आणि तिच्या एका मैत्रिणीने एक अलार्म निर्माण केला आहे. बस, रिक्षा किंवा अन्य कोणत्याही वाहनातील मूल, विद्यार्थी किंवा कोणत्याही व्यक्तीने हात किंवा तेंड बाहेर काढले की वाहनातील हा अलार्म वाजू लागतो. त्यामुळे वाहन चालकाचे किंवा वाहकाचे लक्ष जाते आणि वाहन थांबविले जाते. संबंधित व्यक्तीला तसे न करण्यासाठी सूचना देण्याची संधी आजूबाजूच्या प्रवाशांना किंवा चालक किंवा वाहक यांना मिळते. या अलार्मची निर्मिती ऊर्मि यांनी अवघ्या दोन दिवसांमध्ये केली आहे. त्या या उपकरणाचे पेटंट मिळविण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांना या उपकरणाची विक्री करायची आहे.









