विद्यार्थ्यांनी घेतला सार्वत्रिक निवडणुकीचा अनुभव
मालवण : प्रतिनिधी
मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित,ओझर विद्यामंदिर कांदळगाव, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग या माध्यमिक शाळेत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील शालेय मंत्रिमंडळ स्थापन करण्याच्या उद्देशाने व एक अभिनव उपक्रम म्हणून शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री, स्वच्छता मंत्री, क्रीडामंत्री, शिस्तपालन मंत्री, इत्यादी मंत्र्यांची विद्यार्थ्यांमधून निवड करण्यासाठी सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे संपूर्ण कार्यपद्धती राबवून शाळेत गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीमुळे विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच सार्वत्रिक निवडणुकीचा अनुभव घेता आला. निवडणूक यंत्रणेचे कामकाज कसे चालते ते समजण्यास मदत झाली . या निवडणुकीच्या कामामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शाळेतील साहाय्यक शिक्षक श्री. पी. आर. पारकर तसेच निवडणूक केंद्राध्यक्ष म्हणून साहायक शिक्षक श्री. ए.ए. शेर्लेकर, मतदान अधिकारी म्हणून साहायक शिक्षक श्री.पी.के. राणे व श्रीमती वराडकर यांनी काम पाहिले. त्यास साहाय्यक शिक्षक श्री.एन. एस. परुळेकर व श्री. एस . जे. सावंत यांनी सहकार्य केले. शाळेतील कर्मचारी श्री. पी . व्ही.खोडके आणि श्री. एम. डी. परुळेकर यांनी या कामी बहुमोल मदत केली. अशा प्रकारचे अभिनव उपक्रम शाळेमध्ये राबवून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शैक्षणिक अनुभव देऊन त्यांच्या व्यवहारीक ज्ञानामध्ये वाढ करण्याचा शाळेचा प्रयत्न राहील, असे शाळेचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी सांगितले.