प्रतिदिन या इमारतीमुळे होते वाहतूक कोंडी
इमारती सुंदर किंवा विचित्र असू शकतात. परंतु कधी तुम्ही ‘जिद्दी इमारती’विषयी ऐकले आहे का? चीनमध्ये अशा अनेक जिद्दी इमारती आहेत. ज्यांना तेथे दिनझीहू म्हणजेच नेल हाउस म्हटले जाते. अशाच एका इमारतीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक इमारत महामार्गाच्या मधोमध उभी असल्याचे दिसून येते. या इमारतीमुळे महामार्गावर मोठी वाहतूक केंडी झाल्याचेही या व्हिडिओत दिसून येते. या वाहतूक कोंडीचे कारण व्हिडिओ पाहून सहजपणे समजून येते. ही इमारत रस्त्याच्या मधोमध असल्याने चालकांना स्वत:च्या वाहनांचा वेग कमी करावा लागतो, यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक केंडी होत असते.
ही इमारत चीनच्या कुठल्या प्रांतात आहे याची माहिती मात्र मिळू शकलेली नाही. या इमारतीच्या व्हिडिओला हजारोंच्या संख्येत ह्यूज अन् लाइक्स मिळाल्या आहेत. हा व्हिडिओ आता इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. नवा रस्ता तयार होण्याचा आदेश जारी झाल्यावरही संबंधित क्षेत्रातील घर रिकामी करण्यास नकार देण्यात आल्यास त्याला नेल हाउस म्हटले जाते. अशा घरमालकांच्या हट्टापोटी या इमारती हटविणे प्रशासनासाठी अत्यंत अवघड ठरते. अखेरीस चीनच्या सरकारलाही अशा लोकांच्या हट्टासमोर झुकावे लागते. सरकारसोबत अन्य कुठलाच पर्याय न राहिल्याने या घरांच्या आजूबाजूने रस्त्यांची निर्मिती करविली जाते. तर घरमालकांना वाहनांच्या गोंगाटादरम्यान रहावे लागते. भरपाईवर सहमती न होणे हे अशा घरांना हटविण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरतो. सरकार अन् मालमत्ता विकासकांकडून भरपाईच्या रकमेचा जो आकडा मांडला जातो तो संबंधित घरमालक मान्य करत नाही. याचा परिणाम म्हणून स्वत:चे घर रिकामी करण्यास ते नकार देतात.









