सलामीच्या वॉर्नरचे अर्धशतक, नवोदित टंगचे दोन बळी, ऑस्ट्रेलिया 2 बाद 190
वृत्तसंस्था / लंडन
येथील लॉर्डस् मैदानावर बुधवारपासून सुरू झालेल्या पाच सामन्यांच्या अॅशेस कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याला ऑस्ट्रेलियाने सावध पण भक्कम सुरुवात केली आहे. चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 50 षटकात 2 बाद 190 धावा जमविल्या होत्या. सलामीच्या वॉर्नरने अर्धशतक झळकविले. तर इंग्लंडच्या नवोदित टंगने 2 गडी बाद केले.
ऑस्ट्रेलियाने या अॅशेस मालिकेत पहिली कसोटी जिंकून यजमान इंग्लंडवर यापूर्वीच 1-0 अशी आघाडी मिळविली आहे. या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. वॉर्नर आणि ख्वाजा या सलामीच्या जोडीने ढगाळ वातावरणात सावध फलंदाजी करताना सलामीच्या गड्यासाठी 23.1 षटकात 73 धावांची भागिदारी केली. या सत्रात पावसामुळे काही वेळ खेळ थांबला होता. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी केली. पण इंग्लंडकडून स्लिपमध्ये ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना जीवदाने मिळाली. ऑस्ट्रेलियाचे पहिले अर्धशतक 110 चेंडूत नोंदविले गेले. तसेच वॉर्नर आणि ख्वाजा या जोडीची अर्धशतकी भागिदारी 18.1 षटकात झाली. 9 षटकांच्या खेळानंतर किरकोळ पावसाच्या सरी आल्याने कांहीवेळ खेळत थांबवावा लागला होता. वॉर्नरने उपाहारापूर्वी आपले अर्धशतक 66 चेंडूत 1 षटकात आणि 6 चौकारांच्या मदतीने नोंदविले. उपाहारावेळी ऑस्ट्रेलियाने 23.1 षटकात 1 बाद 73 धावा जमविल्या होत्या. यावेळी वॉर्नर 53 धावांवर खेळत होता. इंग्लंड संघात स्थान मिळविणाऱ्या नवोदित टंगने ख्वाजाचा त्रिफळा उडविला. त्याने 70 चेंडूत 2 चौकारांसह 17 धावा जमविल्या. तो बाद झाल्यानंतर उपाहारासाठी खेळ थांबवण्यात आला.
उपाहारानंतर खेळाच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ झाला. पण केवळ 3 षटके टाकल्यानंतर पावसामुळे पुन्हा खेळ थांबवावा लागला. ऑस्ट्रेलियाचे शतक 182 चेंडूत फलकावर लागले. पाऊस थांबल्यानंतर खेळाला पुन्हा सुरुवात झाली. दरम्यान टंगने सलामीच्या वॉर्नरचा त्रिफळा उडविला. वॉर्नरने 88 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 66 धावा जमविल्या. लाबुशेन व स्मिथ या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी 47 चेंडूत नोंदविली. तर ऑस्ट्रेलियाच्या 150 धावा 228 चेंडूत फलकावर लागल्या. लाबुशेन आणि स्मिथ या जोडीने चहापानापर्यंत संघाची अधिक पडझड होऊ दिली नाही. या जोडीने खेळाच्या दुसऱ्या सत्राअखेर तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 94 धावांची भागिदारी केली होती. लाबुशेन 80 चेंडूत 7 चौकारांसह 45 तर स्मिथ 70 चेंडूत 5 चौकारांसह 38 धावांवर चहापानावेळी खेळत होते. चहापानावेळी ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 2 बाद 190 धावापर्यंत मजल मारली. इंग्लंडतर्फे टंगने 48 धावात 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक- ऑस्ट्रेलिया प. डाव – 50 षटकात 2 बाद 190 (वॉर्नर 88 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 66, उस्मान ख्वाजा 70 चेंडूत 2 चौकारांसह 17, लाबुशेन 80 चेंडूत 7 चौकारांसह 45 धावावर तर स्मिथ 70 चेंडूत 5 चौकारांसह 38 धावावर खेळत आहे. अवांतर- 24, टंग 2-48)