लोकसभेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी : राज्यसभेत काही विधेयकांना मंजुरी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नियोजित संसदीय कामकाजानुसार मंगळवारपासून लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. काँग्रेसच्या वतीने गौरव गोगोई यांनी चर्चेला सुऊवात करत मणिपूरच्या मुद्यावरून सरकारला फटकारले. त्याचवेळी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी आपल्या उत्तरात विरोधी आघाडीला सडेतोड प्रत्युत्तर दिले. भाजप नेते दुबे यांनी स्वातंत्र्यापासून काँग्रेसने केलेले कारनामे उलगडण्यास सुरुवात केल्यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. तर अन्य पक्षाच्या नेत्यांनीही या चर्चेत सहभागी होत आरोप-प्रत्यारोप केल्याने सभागृहात चांगलीच जुगलबंदी निदर्शनास आली. या चर्चेच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 10 ऑगस्टला पंतप्रधान मोदी उत्तर देतील. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधीही गुरुवारीच विरोधकांच्या वतीने चर्चेत सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.

लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू झाली आहे. 10 ऑगस्टपर्यंत सुरू राहणाऱ्या या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांचे थेट लक्ष्य आहेत, तर भाजपही गांधी कुटुंबियांना जोरदार आरोप करत आहे. या तीन दिवसीय ‘राजकीय सामन्या’च्या पहिल्या दिवशी भाजपने आपल्या रणनीतीने विरोधकांना जेरीस आणले. राहुल गांधींना संसदेत बोलू दिले जात नसल्याची तक्रार काँग्रेस करत असतानाच आज चित्र उलटे होते. केवळ भाजप खासदारच राहुल गांधींच्या भाषणाची मागणी करताना दिसले. राहुल गांधी न बोलल्याने सभागृहात काही वेळ गदारोळाची परिस्थितीही निर्माण झाली. अविश्वास ठरावाच्या या चर्चेत काही सदस्य आपापल्या सोयीचे राजकीय मुद्दे उपस्थित करतानाही दिसले. डिंपल यादव यांनी योगींना घेरण्याचा प्रयत्न केला. तर शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी मणिपूरपेक्षा महाराष्ट्रावरच अधिक वेळ भाष्य केले.
पंतप्रधानांनी मौन सोडावे : गौरव गोगोई
काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांच्यावतीने लोकसभेत अविश्वास ठराव मांडण्यात आला. चर्चेला सुऊवात करताना त्यांनी पंतप्रधान मोदींवर प्रश्न उपस्थित केले. गोगोई म्हणाले, ‘आम्ही मणिपूरसाठी हा अविश्वास प्रस्ताव आणला आहे. मणिपूर आज न्यायाची मागणी करत आहे. मणिपूरच्या मुली, शेतकरी, विद्यार्थी न्याय मागतात. मणिपूर जळत असेल तर भारत जळत आहे. मणिपूरची फाळणी झाली तर भारताची फाळणी होईल. आपण केवळ मणिपूरबद्दल बोलत नाही, तर संपूर्ण भारताबद्दल बोलत आहोत. यावर पंतप्रधानांनी बोलावे एवढीच आमची मागणी होती. मात्र पंतप्रधानांनी सभागृहात काहीही बोलणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळेच अविश्वास ठराव आला आहे, असे स्पष्ट केले.
नारायण राणेंची ‘हिंदुत्वा’वरून फटकार
लोकसभेतील अविश्वास ठरावावरील चर्चेत सहभागी होत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी शिवसेनेतील उद्धव गटावर निशाणा साधला. ते म्हणाले की, शिवसेना उद्धव गट सोडून पवार साहेबांसोबत गेली तेव्हा त्यांना हिंदुत्व समजले नाही. आता त्यांचे काही उरले नाही. आता जो आवाज येत आहे तो मांजराचा आवाज आहे, सिंहाचा आवाज टिकला नाही. आता ते आमच्या पंतप्रधानांवर कोणतेही प्रश्न उपस्थित करू शकत नाही. जर पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर हल्ला करण्याची ताकद त्यांच्यात उरलेली नसल्याचे ते पुढे म्हणाले.
मनीष तिवारी, वेणुगोपाल यांचा हल्लाबोल
काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी चीनच्या मुद्यावर भाजप आणि केंद्र सरकारला घेरले. मणिपूरचा संपूर्ण ईशान्य भारतावर परिणाम होत असल्याचा दावा त्यांनी केला. तर काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी सभागृहात सत्ताधाऱ्यांकडून वापरण्यात आलेल्या काही शब्दांना आक्षेप घेतला. सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडणे हे सभागृह नेत्याचे काम आहे, परंतु संसदीय कामकाज मंत्री आणि सुधांशू त्रिवेदी यांनी वापरलेले शब्द भाजपचे अनेक नेते वापरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘इंडिया’ या शब्दाची भीती वाटत असल्यामुळेच ते दररोज ‘इंडिया’वर निशाणा साधत असल्याचे त्यांनी सांगितले.
रिजिजूंकडून जोरदार बचाव
भारताला परकीय शक्तींपासून धोका असल्याचा विरोधकांचा आरोप मंत्री किरेन रिजिजू यांनी खोडून काढला. आज कोणतीही विदेशी शक्ती आपल्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. ते दिवस गेले जेव्हा परकीय शक्ती भारताला काय करावे आणि काय नाही हे सांगायचे, असा टोमणाही त्यांनी मारला. 2014 पूर्वी दिल्ली आणि देशातील इतर मोठ्या शहरांमध्ये ईशान्येकडील अनेक लोकांना वांशिक भेदभाव आणि अत्याचारांना सामोरे जावे लागले होते. 2014 नंतर परिस्थिती बदलली आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच डीजीपी परिषद गुवाहाटीमध्ये झाल्याची बाब केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते किरेन रिजिजू यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान निदर्शनास आणून दिली.
बीजेडीची स्पष्ट ‘नकारघंटा’
बीजेडीचे खासदार पिनाकी मिश्रा म्हणाले की, आज मी केंद्र सरकारविऊद्धच्या अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देऊ शकत नाही. सध्या आम्ही एक राजकीय पक्ष म्हणून भाजपच्या विरोधात आहोत, परंतु केंद्र सरकारने ओडिशासाठी केलेल्या अनेक गोष्टींसाठी मी कृतज्ञ आहे. त्यामुळेच आज काँग्रेस पक्षाने मांडलेल्या अविश्वास ठरावाला पाठिंबा देण्यासाठी मी कोणत्याही परिस्थितीत माझ्या पक्षाच्या व नेत्याच्या वतीने स्वत:चे मन वळवू शकत नसल्याचे चर्चेत सहभागी होत जाहीर केले.
श्रीकांत शिंदे यांचे हनुमान चालिसा पठण
कल्याणमधील शिवसेनेचे खासदार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी लोकसभेत हनुमान चालिसाचे पठण केले. त्यांच्या पक्षाने मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाला विरोध करताना उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधत हिंदुत्व आणि बाळ ठाकरे यांची विचारधारा सोडल्याचा आरोप केला. विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल करताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, विरोधकांनी युपीएचे नाव बदलून ‘इंडिया’ असे ठेवले आहे. पण त्यांची नीती भ्रष्टाचाराशी संबंधित असल्यामुळे यापुढील लढाई फक्त ‘एनडीए’ विऊद्ध ‘इंडिया’ म्हणजे ‘योजना’ विरुद्ध ‘घोटाळा’ अशी होईल असा दावा केला.
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने मतदारांचा विश्वासघात केला. 2019 मध्ये ते निवडणुकीत भाजपसोबत राहिले पण नंतर ते वेगळे झाले. 2019 मध्ये जनतेने शिवसेना आणि भाजपला एकत्र जनादेश दिला. मात्र, मुख्यमंत्रीपदाची भुरळ त्यांना घालण्यात आली. बाळासाहेबांच्या विचारसरणीची, हिंदुत्वाची विचारसरणी यांची त्यांना पर्वा नव्हती. त्यांनी हिंदुत्वाची विचारधारा विकली आणि बाळासाहेबांच्या विचारसरणीपासून दूर गेले, असा हल्लाबोल त्यांनी उद्धव ठाकरे गटावर केला. शिवसेना काँग्रेससोबत युती करेल, याची कल्पनाही कोणी केली नव्हती. ज्या लोकांनी हे सरकार बनवले त्यांनी मतदारांची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केला.
निंदनीय घटनेवरून नवनीत राणांचा संताप
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावाला विरोध करत मणिपूरमध्ये महिलांबाबत जे काही झाले त्याबद्दल कोणीही सहानुभूती दाखवली नाही, असा दावा त्यांनी केला. महिलांबाबत घडलेल्या प्रकाराबाबत विरोधाचा एकही शब्द ऐकू आला नाही. मणिपूरमध्ये आमच्या महिलांसोबत जे काही घडले ते निंदनीय आहे, याला सर्वांनी विरोध केला पाहिजे. तसेच ही घटना (व्हायरल व्हिडिओ असलेली) मे महिन्यात घडली असताना पावसाळी अधिवेशनापूर्वीच व्हिडिओ व्हायरल कसा काय झाला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच राजस्थानमधील महिलांवरील अत्याचारावर विरोधी पक्षांचे नेते का बोलत नाहीत? महिलांच्या प्रश्नावर राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सुप्रिया सुळेंचा एनडीएवर हल्ला
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या नऊ वर्षांच्या कामाचा पाढा वाचून काढला आहे. तसेच ‘एनडीए’ने नऊ वर्षांत नऊ सरकारे पाडल्याचा आरोप केला. महागाई, बेरोजगारी हे मोदी सरकारचे अपयश असल्याची टीकाही त्यांनी केले. मणिपूरच्या हिंसाचारावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत सध्याच्या मणिपूरच्या परिस्थितीमध्ये सरकार इतके असंवेदनशील कसे काय वागू शकते? असा प्रश्नही उपस्थित केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यानंतर तृणमूल खासदार सौगता रॉय यांनीही चर्चेत सहभागी होत महिला सुरक्षाविषयक भाष्य केले. मंगळवारी सभागृहात झालेल्या चर्चेत अन्य नेत्यांनीही सहभाग घेतला. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सभागृहातीच चर्चा थांबवण्यात आली. आता लोकसभेचे कामकाज बुधवारी सकाळी 11 वाजता पुन्हा सुरू होणार असून दुसऱ्या दिवशीही अविश्वास ठरावावरील चर्चा सुरू राहणार आहे.
राज्यसभेत महत्त्वाची विधेयके मंजूर
राज्यसभेने राष्ट्रीय दंत आयोग विधेयक, 2023 आणि राष्ट्रीय नर्सिंग आणि मिडवाइफरी आयोग विधेयक, 2023 आवाजी मतदानाने मंजूर केले. ही दोन्ही विधेयके लोकसभेने यापूर्वीच मंजूर केली आहेत. भारतीय व्यवस्थापन संस्था कायदा, 2017 मध्ये सुधारणा करण्यासाठी राज्यसभेने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (सुधारणा) विधेयक, 2023 मंजूर केले. यापूर्वी हे विधेयक लोकसभेने 4 ऑगस्ट रोजी मंजूर केले होते.









