निवडणुकीपूर्वी चर्चेला बळ : केपी शर्मा ओलींचा पाठिंबा शक्य
वृत्तसंस्था / काठमांडू
जगातील एकमात्र हिंदू राष्ट्र राहिलेल्या नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजेशाही परत आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याचबरोबर नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्र घोषित करत पंतप्रधानांची थेट जनतेतून निवड करण्यात यावी असा मतप्रवाह समोर आला आहे. नेपाळमध्ये सध्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रचाराला वेग आला असून सर्वच राजकीय पक्ष मतदारांना स्वतःच्या बाजूने वळविण्यासाठी आश्वासनांचा वर्षाव करत आहेत. याच राजकीय पक्षांमध्ये उजव्या विचारसरणीची राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी (आरपीपी) असून तिने देशाला पुन्हा हिंदू राष्ट्र करण्याचे आश्वासन दिले आहे. तर माजी पंतप्रधान अन् डाव्या पक्षाचे नेत केपी शर्मा ओली यांनीही हिंदू राष्ट्र निर्मितीला समर्थन करण्याचे संकेत दिले आहेत. आरपीपी अन् ओली यांच्या पक्षाने आघाडी अंतर्गत निवडणूक लढविण्याचे पाऊल उचलले आहे.
आरपीपीला नेपाळमध्ये अत्यंत वेगाने लोकप्रियता प्राप्त होतेय. राजेशाहीला देशाचे संरक्षक करण्यत यावे. नेपाळ एक हिंदू राष्ट्र ठरावे आणि पंतप्रधानांची थेट जनतेतून निवड व्हावी. आगामी काळात सत्ता प्राप्त करण्याऐवजी आमच्या प्राथमिकता प्राप्त करण्यावर भर देणार आहोत असे उद्गार आरपीपीचे अध्यक्ष राजेंद्र लिंगडेन यांनी काढले आहेत. या निवडणुकीत आरपीपीने डावे नेते केपी शर्मा ओली यांचा पक्ष सीपीएन-यूएमएलसोबत आघाडी केली आहे.
हिंदू राष्ट्र निर्मितीचा मुद्दा
सनातन धर्मावर आधारित परंतु सर्व धर्मांना पूर्ण स्वातंत्र्य असणारे हिंदू राष्ट्र स्थापन करण्यात यावे अशी आरपीपीची मागणी आहे. नेपाळमध्ये मागील काही वर्षांमध्ये डावे पक्ष सत्तेवर राहिले असून या काळात देशाची स्थिती अधिकच खराब झाली आहे. यापूर्वी नेपाळचे पर्यटन आणि संस्कृती मंत्री प्रेम अले यांनी देशाला हिंदू राष्ट्र घोषित करण्याच्या मागणीचे समर्थन केले होते.
नेपाळी सैन्याचे माजी जनरल रुकमांगुड कटवाल यांनी नेपाळला पुन्हा हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी एक मोहीम सुरू करत याला हिंदू राष्ट्र स्वाभिमान जागरण’ नाव दिले होते. ही मोहीम धर्माच्या आधारावर ओळख आणि संस्कृतीला चालना देणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. कटवाल हे 2006-09 दरम्यान नेपाळी सैन्याचे प्रमुख राहिले आहेत. हिंदू ओळख पुन्हा प्रस्थापित करणे हे माझे लक्ष्य असल्याचे त्यांनी म्हटले होते. याचबरोबर नेपाळच्या 20 हिंदू धार्मिक संघटनानी संयुक्त आघाडी निर्माण करत हिंदू राष्ट्राच्या मागणीसाठी पावले उचलली आहेत.
ओलींकडून पशुपतिनाथ मंदिरात पूजा
नेपाळमध्ये 81.3 टक्के लोकसंख्या हिंदू आहे. 2007 पूर्वी नेपाळ एक हिंदू राष्ट्र होते. माओवादी हिंसेला तोंड देणाऱया नेपाळला एका अंतरिम राज्यघटनेद्वारे 2007 मध्ये धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित करण्यात आले होते. या निर्णयाला अनेक राजकीय पक्ष अन् संघटनांचा विरोध आहे. नेपाळला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी राजेशाही परतण्याशी पूर्णपणे जोडलेली आहे. नेपाळच्या राजाला भगवान विष्णूचा अवतार मानला जात असल्याने जनतेतही आता राजेशाही पुन्हा आणण्याची मागणी जोर पकडू लागली आहे. माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली हे पशुपतिनाथ मंदिरात पूजा करणारे नेपाळमधील पहिले डावे नेते ठरले होते. त्यांनी अलिकडच्या काळात हिंदू राष्ट्र अन् राजेशाही समर्थकांच्या मागणीला पाठिंब्याचे संकेत दिले आहेत.









