आषाढीची वारी आहे माझे घरी ।। आणिक न करी । तीर्थव्रत ।।
असा भाव बाळगत लाखो वारकरी दरवर्षी आषाढी वारीमध्ये सहभागी होत असतात. यंदाही टाळ मृदंगाच्या गजरात व विठूनामाच्या जयघोषात वैष्णवांचा हा महामेळा पंढरीच्या दिशेने निघाला आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे अनुक्रमे देहू व आळंदीतून प्रस्थान झाले असून, मुक्कामाच्या गावांना निरोप देत सोहळा पुढे मार्गक्रमण करताना दिसत आहेत. याशिवाय संत निवृत्तीनाथ, सोपानकाका यांच्यासह अनेक संतांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने निघाल्या आहेत. त्यामुळे पुढचे 12 ते 13 दिवस भक्तीचा हा सोहळा अवघ्या जगाला अनुभवायला मिळणार आहे. वारीचा उगम केव्हा झाला, ती नेमकी कधी आणि कशी सुरू झाली, हे छातीठोकपणे सांगता येणार नाही. किंबहुना शेकडो वर्षांपासूनची ही परंपरा महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनली आहे, हे निश्चित. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या अभ्यासानुसार, सतराव्या शतकाच्या शेवटी संत तुकाराम महाराजांचे तृतीय पुत्र नारायणबाबा यांनी वारीला ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखीची आणि भजनाची जोड देत सोहळ्याचे रूप दिले. या सोहळ्याला आता महामेळ्याचे ऊप प्राप्त झालेले दिसते. होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ।। असा दृढ विश्वास बाळगत लाखो वारकरी न चुकता आषाढी वारीत एकवटतात. जो वारीचा नेम चुकवत नाही, तो वारकरी. ऊन, वारा, पाऊस, थंडी यापैकी कशाचीही तमा न बाळगता केवळ विठुरायाच्या आत्मिक लळ्यापोटी वारकऱ्यांची पाऊले एका लयीत व शिस्तीत पंढरीच्या दिशेने पडत असतात. विठूनामात इतके सामर्थ्य आहे, की पंढरीची बिकट वाटही सोपी जाऊ जाते. पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल । करावा विठ्ठल । जीवभावे ।।, असे संत तुकाराम महाराज म्हणतात, त्याचा अर्थही हाच. एकदा तुम्ही विठ्ठलाशी जीवाभावाने एकरूप झालात, की मनावर कसले ओझे राहत नाही. षड्रिपूंपासूनही मुक्तता मिळते. मुख्य म्हणजे संतांच्या या वारीत सगळे समान आहेत. येथे कुणी लहान, मोठा वा गरिब, श्रीमंत नाही. म्हणूनच विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम । अमंगळ ।। असे तुकोबाराय म्हणतात. वारकरी संप्रदायात भेदाभेदास कोणतेही स्थान नाही. सर्वधर्मसमभाव, विश्वात्मकता, ही तत्त्वे हा या तत्त्वज्ञानाचा मूलाधार होय. त्या बळावरच वारीच्या या सोहळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्याचे पहायला मिळते. मुख्य म्हणजे काळ बदलला असला, तरी वारीतील लयबद्धता कुठेही हरवलेली नाही. सोहळ्यात हवशे, नवशे, गवशेही येत असतील. परंतु, भक्तिभाव कुठेही कमी झालेला नाही. संतांच्या सखोल, सर्वांगीण व सर्वसमावेशक विचारांवर वारी पोसलेली आहे. वारीचा मार्ग, साधन, साध्य निश्चित आहे. त्यामुळे त्याच मार्गाने ती यापुढेही जात राहणार. खरे तर वारी हा संबंध जगासाठी संशोधनाचा विषय ठरावा. वारीमधील दिंड्या, त्यांचा मुक्काम, भोजनव्यवस्थेसह एकूणच वारीच्या व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी देशोदेशीचे अभ्यासक, संशोधक महाराष्ट्रात येत असतात. वारीचा आणि वारकऱ्यांचा हा शोध संपणे कठीण आहे. वारीतून मिळणारा आनंद आगळाच आहे. त्याला कशाचीही सर नाही, हीच वारकऱ्यांची सार्वत्रिक भावना होय. जाता पंढरीशी सुख वाटे जीवा । आनंद केशवा भेटताचि ।। या अभंग ओळीतून वारकऱ्यांच्या मनीची नेमकी भावावस्था ध्यानात येते. विटेवरी उभे असलेले सुंदर ते ध्यान लोचनांनी पाहण्यातच जगातल्या सर्वोच्च सुखाचा अनुभव वैष्णव घेत असतात. हा अनुभव म्हणजे त्यांच्याकरिता अमृतानुभवच. यंदा मोसमी पावसाचे आगमन लांबले. राज्याच्या काही भागांत नैत्य मोसमी वारे दाखल झाले असले, तरी अद्याप पावसाला सुऊवात झालेली नाही. पावसाअभावी महाराष्ट्रातील शेतीची कामे खोळंबलेली आहेत. वारीला येणारा वारकरी हा बव्हंशी शेतकरी आहे. पुढच्या टप्प्यात पाऊस झाला, तर पालखी सोहळ्यातील गर्दी वाढू शकते. वारीतील स्वच्छतेबाबतही नेहमी चर्चा होत असतात. पालखी मुक्काम हलल्यानंतर त्या गावांची काय स्थिती असते, हे तेथील गावकरीच अधिक जाणतात. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्वत: हाती झाडू घेत समाजाला स्वच्छतेचा संदेश दिला. त्यामुळे वारकरी, गावकऱ्यांसह सर्वांनाच भक्तीबरोबरच स्वच्छतेचाही जागर अधिक क्षमतेने करावा लागेल. संत नामदेवांनी ‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ।।’ असे म्हटले आहे. संत सावता माळी ‘कांदा मुळा भाजी । अवघी विठाई माझी ।।’ अशा शब्दांत निसर्गातच देवत्व अनुभवतात. संत तुकाराम महाराज ‘ऐसे कैसे झाले भोंदू’ म्हणत भोंदूगिरीवर अंधश्रद्धेवर प्रहार करतात. तर संत ज्ञानेश्वर महाराज विश्वासाठी पसायदान मागतात. संतांचे विचार अवघ्या जगाला कवेत घेणार आहेत, हे यातून अधारेखित होते. कोणताही समाज हा केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे, तर आचाराविचारांनी एकत्र येणे फार महत्त्वाचे असते. अशा प्रकारे एकत्र येण्यातूनच तो समाज या संज्ञेस खऱ्या अर्थाने पात्र ठरत असतो. म्हणूनच आजच्या काळात संतविचारांची कास धरणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस समाजातील नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे. आपापसांतील मैत्रभाव संपुष्टात येत आहे. जात, धर्म या गोष्टी अधिक टोकदार बनत चालल्या आहेत. माणसामाणसांतील संवाद आटत चालला आहे. तर माणुसकी, मानवता आदी उच्चतम मूल्ये केवळ ग्रंथ वा पुस्तकांमध्ये वाचण्यापुरती राहिली आहेत की काय, असा प्रश्न पडला आहे. काम, क्रोध, मद, लोभ, मोह, मत्सर, अशा षड्विकारांचा विळखा अधिकाधिक घट्ट होत असल्याचे दिसून येते. गुंडगिरी, भ्रष्टाचार, फसवणूक, बलात्कार, अत्याचार यांसारखे गुन्हे वाढत आहेत. नवी पिढी संस्कारांपासून दूर जात असून, चंगळवादाच्या आहारी जात आहे. या साऱ्यातून अनेक सामाजिक समस्या निर्माण होताना दिसतात. उलटपक्षी, प्रेम, माया, ममता, अहिंसा, विनम्रता, आदरभाव ही भेकुडपणाची लक्षणे मानली जातात. अशा वातावरणात दिशाहीन होण्याचा धोका खचितच अधिक आहे. म्हणूनच आता संतविचारांशिवाय पर्याय नाही. मुळात संतविचार अंधश्रद्ध नव्हे, तर डोळस बनविणारे आहेत. म्हणूनच या चैतन्यवारीत ‘तुका म्हणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दिस । जागृतीचा ।।’ ही ओवी ध्यानात घेत मनोमनी जागृती घडावी.