कमळाच्या पानांचा मास्क लावण्याचा प्रकार
चीनमध्ये युवांदरम्यान सध्या एक नवा ट्रेंड सुरू आहे. हा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तेथे सोशल मीडियावर युवक-युवती कमळाच्या पानांचा मास्क तयार करत तो चेहऱ्यावर लावत असल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अशाप्रकारचे मास्क वापरणारे लोक बाइक चालवितात, सायकल चालवतात आणि धावताना दिसून येत आहेत.
दक्षिण चीनच्या झेजियांग, सिचुआन आणि फुजियान प्रांताचे लोक रस्त्याच्या काठावर असलेल्या तलावांमधून एकत्रित कमळाच्या पानांद्वारे स्वत:साठी मास्क तयार करत आहेत आणि तो वापरत त्याचा व्हिडिओ अपलोड करत आहेत. व्हिडिओवर ते उन्हापासून वाचण्यासाठी नैसर्गिक सनस्क्रीन अशी कॅप्शनही देत आहेत.
पानांमध्ये छिद्र
व्हायरल व्हिडिओत लोक स्वत:च्या चेहऱ्याला विशाल पानांनी झाकत असल्याचे दिसून येते. या पानाचा आकार चेहऱ्यापेक्षा कमीतकमी दुप्पट आहे. या पानांना चेहऱ्यावर बांधण्यासाठी टोपी किंवा हेल्मेटचा वापर केला जात आहे. तर पानांमधून पाहण्यासाठी अन् श्वसनासाठी डोळे अन् नाकाच्या ठिकाणी छिद्रं पाडली जात आहेत.
अत्यंत मजेशीर व्हिडिओ
या व्हिडिओवरून ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. यातील लोक विशाल डास किंवा पिनोच्चियोसारखे दिसत असल्याचे अनेक लोकांनी म्हटले आहे. पिनोच्चियो हे डिस्नेचे पात्र असून खोटे बोलताना त्याचे नाक लांब होत असते.
सनटॅनपासून सुरक्षा
दक्षिणपूर्व चीनच्या फुजियान प्रांतात यिन नावाचे डॉक्टर आहेत. त्यांनी घरानजीकच्या तलावातून कमळाचे पान मिळवत मास्क तयार केला होता. याचा वापर त्यांनी सनटॅनपासून वाचण्यासाठी केला, हा उपाय अत्यंत प्रभावी वाटला, माझ्या चेहऱ्याला वगळता सर्वत्र टॅन झाले आहे. हा उपाय नैसर्गिक अन् मोफत असल्याचे यिन यांनी म्हटले आहे.









