गरुडाचा वेश धारण केल्यास मिळणार मनाजोगा पगार
एका प्राणीसंग्रहालयाने अजब नोकरीसाठी जाहिरात दिली आहे. या प्राणिसंग्रहालयात गरुडाचा वेश धारण करून दिवसभर रहावे लागणार आहे आणि याकरता संबंधिताला मनाजोगा पगार मिळणार आहे.
ब्रिटनचे ब्लॅकपूल प्राणिसंग्रहालय मोठय़ा पक्ष्यांची वेशभूषा करणाऱया आणि दिवसभर उपद्रवी सीगल पक्ष्याला घाबरवून पळवून लावणाऱया लोकांचा शोध घेत आहे. या प्राणिसंग्रहालयात 1 हजाराहून अधिक प्राण्यांचे वास्तव्य आहे. हे प्राणी पाहण्यासाठी मोठय़ा संख्येत लोक येत असतात. परंतु या प्राणिसंग्रहालयात आक्रमक सीगल पक्षी पोहोचतात, जे पर्यटकांचे अन्न पळवून नेत आहेत. या पक्ष्यांची दहशत दूर करण्यासाठी आता गरुड किंवा ससाण्यासारखी वेशभूषा करून दिवसभर उभ्या राहणाऱया लोकांची टीम तयार केली जात आहेत.

आम्ही सर्व प्राण्यांवर प्रेम करतो, परंतु सीगल पक्षी पर्यटकांना मोठा त्रास देत आहेत. याचमुळे आम्ही त्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करत आहोत. याचमुळे आमच्या टीममध्ये सीगल डिटरेंट्स ठरू शकतील अशा युवक-युवतींची भरती करत आहोत असे प्राणिसंग्रहालयाने नोकरीविषयक जाहिरातीत नमूद केले आहे.
पर्यटकांसोबत चांगले वर्तन करू शकेल अशा लोकांचा शोध प्राणिसंग्रहालय घेत आहे. मागील आठवडय़ात सीगलने एका अन्य पक्ष्याला जखमी केले होते. तसेच या पक्ष्याला वाचविण्यासाठी गेलेल्या एका इसमावरही सीगलने हल्ला केला होता. सागरी पक्षी असलेल्या सीगलने ब्रिटनमध्ये मोठी दहशत निर्माण केली आहे. सीगलच्या भीतीपोटी लोक आता समुद्रकिनारी हेल्मेट किंवा अन्य सुरक्षाकवचाचा वापर करत आहेत.









