चिलीमध्ये मच्छिमारांना पकडला मासा
चिली या देशात मच्छिमारांच्या एका समुहाने अलिकडेच एक अजब मासा पकडला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या माशाची लांबी 16 फूट असून तो प्रचंड वजनी असल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली आहे. स्थानिक लोकांनी ही घटना कॅमेऱयात कैद केली असून याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

पकडण्यात आलेला मासा हा ओरफिश प्रजातीचा आहे. हा मासा 36 फूटांपर्यंत लांबीचा असू शकतो. सर्वसाधारणपणे खोल समुद्रात हा आढळतो, हा मासा आजारी असल्यास, मृत्युशय्येवर असल्यास किंवा प्रजननासाठी समुद्राच्या पृष्ठभागावर येत असतो. हा मासा सापडण्याचा प्रकार अत्यंत दुर्लभ आहे. यापूर्वी ओरफिश एप्रिल महिन्यात न्यूझीलंडच्या एका समुद्र किनाऱयावर दिसून आला होता.
शापित मासा
ओरफिश मिळणे अपशकुन असल्याचे चिलीमधील मच्छिमारांचे मानणे आहे. ओरफिशला पारंपरिक स्वरुपात त्सुनामी आणि भूकंपासाठी अपशकुन म्हणून मानले जाते. हा मासा पृष्ठभागावर कसा आला याचे संशोधन आता स्थानिक अधिकारी करत आहेत. व्हायरल व्हिडिओला चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर 1 कोटीपेक्षा अधिक वेळा पाहिले गेले आहे. तसेच युजर्स हा व्हिडिओ युटय़ूब आणि ट्विटरवरही शेअर करत आहेत.









