प्रतिनिधी / बेळगाव : सध्या शेतीमध्ये रासायनिक खते वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जमिनीला मीठ फुटने, जमिनी नापीक होणे असे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे आता बरेच शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळताना दिसत आहेत. त्यामध्ये गांडूळखत हे फायदेशीर ठरते. त्यामुळे रासायनिक खताला फाटा देत तीघा मित्रांनी मिळून गांडूळ खत प्रकल्पाची निर्मिती केली आहे.
तुमची माती जिवंत असू दे, एक पाऊल जैविक शेतीकडे या उद्देशाने मुचंडी मराठा कॉलनी, गोकाक रोड, बेळगाव येथे सात्विक गांडूळ खत हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात कोरोना रोगाच्या पादुर्भावाने लोकांची प्रतिकारशक्ती कमी झाली होती. त्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या रोजच्या अन्नामध्ये असलेली पोषकद्रव्यांची उणीव, तसेच शेतामध्ये वापरण्यात येत असलेले रासायनिक खत यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. हीच गरज ओळखून समाजासाठी पोषक अन्न मिळावे याकरिता आम्ही कामास लागलो. असे सिद्धार्थ भातकांडे, धनंजय मोदगेकर आणि लक्ष्मीकांत मुतकेकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त कले. हे तिघेही सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. पिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याकरिता गांडूळ खत उपयोगी ठरते हे ज्यावेळी त्यांना लक्षात आले त्यावेळी त्यांनी कोल्हापूरसह विविध ठिकाणी भेट देऊन गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाची माहिती घेतली. त्यानंतर हा प्रकल्प सुरू केला. रासायनिक खताला हा प्रकल्प योग्य पर्याय ठरतो. गांडूळ खत हे नैसर्गिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे आवश्यक असल्याचे सिद्धार्थ भातकांडे यांनी सांगितले.
गांडुळामध्ये रेड विंगलर्स आणि लॅम्बरीकस रूबेलियस असे दोन प्रकार आहेत. रेड विंगलर्सचा येथे उपयोग केला जातोय. शेणखत, उरलेला पालापाचोळा, भाजीपाला यांचे सेवन करून गांडूळ खत निर्माण करते. तसेच सात पटीने त्यांची वाढ होते. त्यामुळे त्यांचा वापर हा फायदेशीर ठरतो. गांडूळखत प्रकल्प निर्मितीला योग्य ती जागा आवश्यक आहे. त्याचबरोबर पोषक वातावरण गरजेचे आहे. असे गांडूळखत उत्पादक सिद्धार्थ भातकांडे म्हणाले.
हे खत थरांच्या निर्मितीव्दारे केले जाते. ४५-५५ दिवसात पहिला थर त्यानंतर ६५-७० दिवसात दुसरा थर तयार होतो. यासाठी लागणाऱ्या बेड्सचे दोन प्रकार असतात. पिट मेथड म्हणजेच खड्ड्यांमध्ये खत तयार करणे, दुसरी पध्दत ही सिमेंट किंवा प्लॅस्टीक बॅग बेडची निर्मिती. मात्र, सिमेंट टाकीमध्ये खताला बाहेरील हवा आत खेळत नसल्याने याला पर्याय म्हणून प्लॅस्टीकबॅग उपयोगी ठरते. गांडूळखतासाठी विशेष तयार करण्यात आलेल्या प्लॅस्टीक बॅगमध्ये हवा खेळण्यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. ही बॅग वर्षानुवर्षे टिकणारी आहे. अशी माहिती धनंजय मोदगेकर यांनी दिली.
शेतकऱ्यांसाठी ५० किलोचे पॅकेजेस तयार केले असून गार्डनिंगसाठी १ ते ५ किलोचे पॅकेजेस उपलब्ध असून त्यांची अत्यंत माफक दराने विक्री होते. गांडूखताबद्दल अॅग्रीकल्चरल शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा शेतकऱ्यांना अधिक माहिती हवी असल्यास, त्यांनी आमच्या प्रकल्पाला कधीही भेट द्यावी. येथे त्यांना योग्यते मार्गदर्शन केले जाईल असे लक्ष्मीकांत मुतकेकर यांनी सांगितले.
या तिघांनी गांडूळ खताचा वापर करून चांगले उत्पन्न घेतले आहे. या खतामुळे शेतजमीन अधिक सुपिक झाल्याचे आम्हाला अढळून आले. आमच्या शेतामध्ये या खताचा वापर केल्याने कारल्याचे पहिले पिक भरपुर प्रमाणात मिळाले. त्यामुळे समाधानी असल्याचे पुंडलीक वरपे म्हणाले…

या गांडूळखताबद्दल अधिक माहितीसाठी संपर्क क्र. ९४८०८९५७२१, ८३१०८५९०७५, ७७९८८०९७३३











