तालुक्यातील एसडीएमसी सदस्यांच्या बैठकीत निर्णय : शाळांमधील समस्या निवारणाची आवश्यकता
वार्ताहर/किणये
तालुक्याच्या विविध गावातील सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे या शाळांमध्ये शिक्षकांची त्वरित नियुक्ती करण्यात यावी. ज्या शाळांमध्ये मुख्याध्यापक नाहीत, अशा शाळांमध्ये मुख्याध्यापकांची नियुक्ती करण्यात यावी. यासह विविध मागण्यांचे निवेदन दि. 30 रोजी जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. तालुक्यातील एसडीएमसी कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांची रविवारी दुपारी मराठा मंदिर शहापूर येथे बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. तालुक्यातील बहुतांशी शाळांमध्ये अनेक समस्या आहेत. याकडे प्रशासनाचे व शिक्षण खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. बऱ्याच शाळांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. नुकसान टाळण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक असणे आवश्यक आहेत.
सरकारी मालमत्तेच्या संरक्षणासाठी उपाययोजनेची गरज याचबरोबर काही गावातील शाळांच्या पटांगणामध्ये प्लास्टिक बाटल्या, दारूच्या बाटल्या टाकण्याचे प्रकार घडू लागले आहेत. सरकारी मालमत्तेचे संरक्षण व्हावे, शाळेचा परिसर व शाळा सुरक्षित रहावी या दृष्टिकोनातून प्रत्येक शाळेमध्ये प्रशासनाकडून सीसी कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी आपली मुले सरकारी शाळेतच पाठवावी अलीकडे सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत असल्याने ती वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलांना सरकारी शाळेत पाठवावे अशी मागणी करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील अनेक शाळा विविध सुविधांपासून वंचित आहेत. तसेच तालुक्यातील बऱ्याच शाळांचा विकास होणे गरजेचे आहे. या शाळांसाठी आता एसडीएमसी कमिटी या संघटनेच्या माध्यमातून आवाज उठविण्यात येणार आहे असेही सदर बैठकीत ठरविण्यात आले. बैठकीला गंगाधर गुरव, मनोहर हुंदरे, आण्णाप्पा पाटील, बसवंत पाटील, इराप्पा चांदलकर, कल्लाप्पा असोगेकर, राजू पाटीलसह विविध गावातील कमिटीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.









