बेळगाव : पहिल्या रेल्वेगेटजवळ अपघात नियंत्रण करण्यासाठी एका संस्थेच्या अहवालावरून बॅरिकेड्स घालण्यात आले आहेत. मात्र अपघात फक्त पहिल्या रेल्वेगेटजवळच होतात का? जेथे अपघात होण्याची शक्यता आहे तेथे बॅरिकेड्स नाहीत, फक्त पहिल्या रेल्वेगेटजवळ बॅरिकेड्स घालून नागरिकांची गैरसोय करण्याचे कारणच काय? असा प्रश्न बॅरिकेड्स हटाव मोहिमेचे कार्यकर्ते सुभाष घोलप यांनी केला आहे.
बॅरिकेड्स हटाव मोहिमेसाठी गेल्या 8 वर्षांपासून ते लढा देत आहेत. पंतप्रधान कार्यालयापासून स्थानिक प्रशासनापर्यंत सर्वांना त्यांनी निवेदने दिली आहेत. नुकत्याच झालेल्या फोनइन कार्यक्रमात त्यांनी पुन्हा जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्याकडेही तक्रार केली. राज्य पोलीस महासंचालकांकडेही तक्रार केली होती. त्यांनी पोलीस आयुक्तांनी याबाबत पाहणी करावी, असा आदेश दिला होता. याच अनुषंगाने पुन्हा पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनाही निवेदन दिले व बॅरिकेड्स न हटविल्यास उपोषण करण्यात येईल, असे सांगितले. त्यांच्यासमवेत मनोहर शिरोड आणि उंटवाले उपस्थित होते.









