काँग्रेस सरकार विरोधात जोरदार निदर्शने, हिंदूविरोधी कायदे मागे घेण्याची मागणी
खानापूर : कर्नाटक सरकारच्या हिंदूविरोधी भूमिकेच्या विरोधात खानापूर तालुक्मयातील विविध हिंदू संघटनांच्यावतीने सोमवारी मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. तसेच तहसीलदार कार्यालयावर ठिय्या आंदोलन करून हिंदूविरोधी कायदे मागे घेण्याचे तसेच वगळलेले धडे पुन्हा सामील करावेत, या मागणीचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तालुक्यातील विविध हिंदू संघटनांच्यावतीने कर्नाटकातील काँग्रेस सरकारने पाठ्यापुस्तकातील हेडगेवार, सावरकर यांचे धडे वगळले आहेत. तसेच धर्मांतरविरोधी कायदा रद्द केला आहे. गोहत्या बंदी उठवली आहे. याबाबत सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. येथील लक्ष्मी मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. शिवस्मारक येथील महामार्गावर जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून काँग्रेस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच हिंदूविरोधी कायदे मागे घेण्याचे सरकारने तातडीने थांबवले पाहिजेत, तसेच पाठ्यापुस्तकातील स्वातंत्र्यविरांचे धडे वगळण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे. तो मागे घेऊन वगळण्यात आलेले धडे पुन्हा सामील करण्यात यावे, तसेच धर्मांतरविरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय हेंदूविरोधी असून हा हिंदू धर्मावर घाला असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. उपतहसीलदार कल्लाप्पा कोलकार यांनी निवेदनाचा स्वीकार केला. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष संजय कुबल, बाबुराव देसाई, पंडित ओगले, मल्लाप्पा मारिहाळ, नंदकुमार निट्टूरकर यासह अनेकांची भाषणे झाली. तालुक्यातील शेकडो हिंदू कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.









