वीज दरवाढीला विरोध
खानापूर : राज्यात काँग्रेस सत्तेवर येताना पाच गॅरंटी दिल्या आहेत. त्यातील दोनशे युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्याची अंमलबजावणी करत असताना प्रति युनिट 80 पैसे वाढवून सरळ सरळ वीज बिल वाढीचा झटका दिला आहे. राज्य सरकारने सामान्य जनतेला मेटाकुटीला आणले आहे. याच्या निषेधार्थ सोमवार 5 जून रोजी खानापूर तालुका भाजपतर्फे तहसीलदारांना निवेदन दिले. वीज अंमलबजावणी करत असताना राज्याला आर्थिक खाईत ढकलण्याचे कार्य काँग्रेस करत आहे, असा घनाघात यावेळी करण्यात आला. यावेळी तहसीलदारांना निवेद देऊन सरकारचा तीव्र निषेध केला. सदर वीज दरवाढ त्वरित मागे घ्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल, माजी आमदार अरविंद पाटील, तालुका, जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, गुंडू तोप्पीनकट्टी, नगरसेवक आपय्या कोडोळी, पंडित ओगले, बाळाराम सावंत, माजी जि. प. सदस्य जोतिबा रेमाणी, राजू रायका, शिवा मयेकर यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ग्रेड टु तहसीलदार तंगोळी यांनी निवेदनाचा स्वीकार करून आपण आपली मागणी वरिष्ठांना कळविण्यात येईल असे आश्वासन दिले.









