दंगलखोरांकडून महापौरांच्या घरावर हल्ला : बँका, शॉपिंग मॉल्सची मोठ्या प्रमाणावर लूट
वृत्तसंस्था/ पॅरिस
फ्रान्समध्ये पोलिसांकडून 17 वर्षीय अल्पवयीनावर गोळ्या झाडण्यात आल्याच्या घटनेनंतर सलग पाचव्या दिवशी पूर्ण देशात दंगली सुरू राहिला आहेत. या दंगलीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलांना तैनात करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी हिंसेच्या प्रमाणात घट झाल्याचा दावा केला आहे. परंतु रविवारी पोलिसांकडून 719 दंगलखोरांना अटक करण्यात आली आहे. फ्रान्समध्ये आता आणीबाणी लागू केली जाणार असल्याचे मानले जात आहे. या दंगलींमुळे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. या दंगली रोखण्यास त्यांच्या प्रशासनाला अपयश आल्याची टीका होऊ लागली आहे.

पॅरिसमधील उपनगर नॅनटेरेनमध्ये 17 वर्षीय नाहेलच्या मृत्यूनंतर भडकलेल्या दंगलींनंत आता हिंसेत घट होत असल्याचा दावा फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डर्मैनिन यांनी केला आहे. तर दुसरीकडे दंगलखोरांनी पॅरिसच्या दक्षिणेत एका शहराच्या महापौराच्या घरात कार घुसविली. या हल्ल्यात महापौराची पत्नी आणि मुलगा जखमी झाला आहे. माझे कुटुंब झोपलेले असताना समाजकंटकांनी घराला आग लावण्यापूर्वी परिसरात एक कार घुसविली होती. मागील रात्री भय अन् अपमानाचे वातावरण स्वत:च्या पराकाष्ठेवर पोहोचेले होते. हा एकप्रकारे हत्येचा भ्याड प्रयत्न होता असे उद्गार महापौर विंसेंट जीनब्रून यांनी ट्विट करत केला आहे.
हिंसा रोखण्यासाठी देशभरात 45 हजार पोलीस जवान तैनात करण्यात आल्याची माहिती फ्रान्सच्या गृह मंत्रालयाने दिली आहे. मंगळवारी रात्री हिंसक निदर्शनांना सुरुवात झाल्यापासून पोलिसांनी एकूण 2,400 जणांना अटक केली आहे. चिलखती वाहने आणि हेलिकॉप्टर्ससोबत पोलीस कर्मचारी फ्रान्समधील तीन सर्वात मोठी शहरे पॅरिस, ल्योन आणि मार्सिलेच्या रस्त्यांवर गस्त घालत आहेत.
हिंसा करणाऱ्या निदर्शकांसोबत पोलिसांचा शनिवारी रात्रभर संघर्ष झाला आहे. विविध ठिकाणी निदर्शकांनी सुमारे 2500 दुकानांमध्ये तोडफोड आणि जाळपोळ केली आहे. 10 शॉपिंग मॉल, 200 हून अधिक सुपरमार्केट आणि 250 तंबाखूची दुकाने आणि 250 बँक आउटलेटवर हल्ला करण्यात आला असून तेथे लूट करण्यात आल्याच माहिती अर्थमंत्री ब्रूनो ले मायेर यांनी दिली आहे. निदर्शकांनी ग्रिग्नीमध्ये एका निवासी इमारतीला आग लावल्याचेही वृत्त आहे.
वाहतूक तपासणीदरम्यान मंगळवारी 17 वर्षीय नाहेलचा पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला होता. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला होता. या व्हिडिओत दोन अधिकारी कारच्या खिडकीनजीक उभे असल्याचे आणि यातील एकाने चालकावर बंदूक रोखल्याचे दिसून येते. नाहेलने कार पुढे घेताच एका अधिकाऱ्याने त्याच्यावर गोळी झाडली होती. यात नाहेलचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर फ्रान्समध्ये दंगली घडत आहेत. या दंगली प्रामुख्याने अल्जीरियन अन् मोरक्कोतून फ्रान्समध्ये स्थलांतरित झालेले लोक घडवून आणत असल्याचे समोर आले आहे.









