दोन महिन्यात पुन्हा नुकसान, नागरिकांतून संताप
बेळगाव : जिजामाता चौक येथील ध्वजस्तंभाला बुधवारी पहाटे पुन्हा एकदा धडक दिल्याने नुकसान झाले आहे. ध्वज उभारण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चौथऱ्याचेही नुकसान झाले असून स्तंभ एका बाजूला वाकला आहे. भरधाव टिप्परने धडक दिल्याने ही घटना घडल्याचे स्थानिकांचे मत आहे. अवघ्या दोन महिन्यांत दुसऱ्यांदा ध्वजाला धडक दिल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील एक महत्त्वाचा चौक म्हणून जिजामाता चौक ओळखला जातो. जुन्या धारवाड रोडवर हा चौक असल्याने नेहमीच वाहनांची वर्दळ असते. दोन महिन्यांपूर्वी एका मालवाहू ट्रकने रात्रीच्या वेळी धडक दिल्याने चौथरा व ध्वजस्तंभाचे मोठे नुकसान झाले. परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी तसेच नगरसेवक यांनी संयुक्त प्रयत्नातून दोनच दिवसात स्तंभ पुन्हा उभा केला. परंतु, अवघ्या दोन महिन्यात पुन्हा एकदा धडक दिल्याने ध्वजस्तंभ व चौथऱ्याचे नुकसान झाले आहे. जिजामाता चौकाला नामकरण करताना संघर्ष करावा लागला होता. शिवाजी कंपाऊंड येथील व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन या नामकरणासाठी पुढाकार घेतला होता. त्याचीच एक आठवण म्हणून ध्वजस्तंभ उभारण्यात आला. शहरातील एक महत्त्वाचा चौक म्हणून जिजामाता चौक ओळखला जातो. त्यामुळे प्रशासनाने चौथऱ्याचे पुन्हा बांधकाम करून स्तंभ सरळ करावा, तसेच यापुढे कोणत्याही वाहनाची धडक बसणार नाही, यासाठी भक्कम चारी बाजूंनी भिंत बांधावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.









