प्रतिनिधी /वास्को
वास्को कुठ्ठाळी महामार्गावरील माटवे दाबोळी भागात एक कार नाल्यात पडल्याने तिघे जण जखमी झाले. भरधाव निघालेल्या चालकाचा वाहनावरील ताबा गेल्याने हा अपघात घडला. एजबॉन डिसोजा, मॅशवीन सिल्वेरा, औदुंबर कामळेकर व एवीन रॉड्रिक्स अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांना गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले आहे.
वास्को पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात शुक्रवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास घडला. वास्को कुठ्ठाळी महामार्गावरील माटवे दाबोळी या भागात असलेल्या एका वळणावरील सांकवाजवळ फॉर्ड एनडेवोर(जीए 06 ई 6451) ही कार तेथील नाल्यात कोसळली. या कारमध्ये चालकासह चौघेजण होते. ते वास्कोहून कुठ्ठाळीच्या दिशेने जात होते. चालकाचा वाहनावरील ताबा गेल्याने त्यांची कार नाल्यात कोसळली. सुदैवाने सर्व जण जखमी होऊन वाचले. काहींची हाडे मोडली आहेत. त्यांना गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले आहे. वास्को पोलीस व अग्नीशामक दलाला ही माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशामक दलाने जखमींना अपघातग्रस्त कारमधून बाहेर काढले. एजबॉन डिसोजा हा कार चालवत होता. तो कुठ्ठाळीतील राहणारा आहे. जखमी मॅशवीन व औदुंबर हे गोवा वेल्हा या भागातील आहेत. एवीन हा आगशी येथील आहे. वास्को पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.









