हिरेबागेवाडीच्या साहाय्यक उपनिरीक्षकांसह पोलीस जखमी
बेळगाव : भरधाव कँटरने पोलीस वाहनाला धडक दिल्यामुळे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांसह दोघेजण जखमी झाले. गुरुवारी मध्यरात्री पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोंडसकोप्पजवळ ही घटना घडली असून याप्रकरणी उत्तरप्रदेशमधील कँटरचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बसाप्पा सोमनिंगप्पा नागण्णावर (वय 53) व शहर सशस्त्र दलातील हनुमंत आप्पण्णा बारकी (वय 38) हे दोघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात आले आहेत. घटनेची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
गुरुवारी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. बसाप्पा नागण्णावर व हनुमंत बारकी हे दोघेजण केए 22 जी 1440 क्रमांकाच्या पोलीस वाहनातून पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गस्त घालत होते. बेळगावहून धारवाडकडे निघालेल्या कँटरची पोलीस वाहनाला पाठीमागून धडक बसली. त्यामुळे हा अपघात घडला. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नावेद अख्तर बरकतअली अन्सारी या कँटरचालकाला ताब्यात घेतले आहे. एमएच 46, बीएफ 0558 क्रमांकाची कँटरही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. हिरेबागेवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.









