चहाच्या अनेक प्रकारांबद्दल तुम्ही ऐकले असेल. कदाचित यापैकी काही प्रकारांचा आस्वादही घेतला असेल. परंतु एका चहा पावडरचे उत्पादन केवळ भारतातच होते. या चहाच्या पानांना केवळ चांदण्या रात्रीतच तोडले जाते. एवढेच नव्हे तर चहाची ही पाने तोडणारे लोक देखील अत्यंत खास असतात. ही जगातील सर्वात महाग चहापैकी एक असून याची किंमत त्याच्या वैशिष्ट्यामुळेच अत्यंत अधिक आहे.
भारतात आसाम, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये चहाचे उत्पादन घेतले जाते. परंतु दार्जिलिंगमध्ये एक विशेष प्रकारचे चहाचे मळे आहेत. या चहाच्या मळ्यांमधून जगातील सर्वात महागडी चहा पावडर प्राप्त होते. सिल्वर टिप्स इम्पीरियल चहा हा दुर्लभ प्रकारचा चहा पत्ती असून तो पौर्णिमेच्या रात्रीच तोडला जातो. वर्षभरात केवळ 4 किंवा पाचवेळाच याची पाने तोडली जातात. सिल्वर टिप्स इम्पीरियल चहाला काही खास लोकच तोडतात, मकाईबाडी चहामळ्याशी संबंध असलेल्या लोकांनाच ही जबाबदारी दिली जाते. या चहामध्ये पृथ्वीवरील प्रत्येक जादू, ब्रह्मांडातील प्रत्येक रहस्य आणि मातीची सर्व शक्ती सामावलेली असल्याचे येथील चहाच्या मळ्यांमधील मजुरांकडून सांगण्यात येते. पौर्णिमेच्या रात्री या चहाच्या मळ्यांमध्ये पाने तोडली जातात आणि पहाट होण्यापूर्वी ती पाकिटबंद करून पाठविली जातात. सूर्यकिरणे या चहाच्या पानांवर पडल्यावर याचा सुगंध कमी होत असल्याचे मानले जाते.
दार्जिलिंगमध्ये अशाप्रकारचा चहा पावडर केवळ 100-150 किलो इतकाच निर्माण होतो. तसेच तो अमेरिका, जपान, ब्रिटनच्या खरेदीदारांकडून विकत घेतला जातो. स्थानिक लोकांनुसार ब्रिटिश राजघराणे या प्रकारच्या चहाचे चाहते आहे. या चहाच्या मळ्यांमधील पाने तोडण्याची प्रक्रिया अत्यंत विशेष असल्याने ती अनुभवण्यासाठी दूरदूरवरून पर्यटक येत असतात. 2014 मध्ये या चहाचा लिलाव करण्यात आला तेव्हा एका किलोला 1.53 लाख रुपयांची किंमत मिळाली होती. सध्या 50 ग्रॅम चहापावडरची किंमत 36 डॉलर्स म्हणजेच 3000 रुपये इतकी आहे. हा चहा तारुण्य टिकविण्यात अत्यंत मदत करत असल्याचे चहाच्या मळ्यांच्या मालकांकडून सांगण्यात येते.









