कोल्हापूर :
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातील लोकप्रतिनिधीसोबत नुकतीच बैठक घेतली आहे. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून यावर लवकरच मार्ग निघेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विकासकामांच आढावा घेतला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार राजेश पाटील आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार हद्दवाढीबाबत म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह हद्दवाढीशी संबंधित असणारे जे नव्याने निवडून आले आहेत, अशा लोकप्रतिनिधीसोबत सोबत हद्दवाढीबाबत चर्चा केली आहे. पाच लाख लोकांचे ते प्रतिनिधीत्व करतात. त्याचे म्हणणे ऐकून घ्यावे लागते. यावेळी हद्दवाढीबाबत सकारात्मक चर्चा झाली असून नक्कीच लवकरच यावर मार्ग निघेल, अशी अपेक्षित आहे.
प्रशांत कोरटकर यांच्या कबुली जबाबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले. पोलिसांकडून संबंधितास अटक केली असून या प्रकरणी चौकशी सुरू आहे. त्यांनी कबुली जबाब दिला असल्यास आवश्यक ती कागदपत्रे सादर करून पुढील कार्यवाही होईल.
- आर्थिक स्थिती पाहूनच जाहीर केलेल्या घोषणाची अंमलबजावणी
निवडणूकीवेळी कर्जमाफीची घोषणा केली होती परंतू अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे वसुलीवर परिणाम होत आहे. शेजारील राज्याने केलेल्या घोषणाची अंमलबजावणी पहिल्या मंत्रीमंडळातच केली असल्याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, राज्याची आर्थिक घडी विस्कळणार नाही. आर्थिक शिस्त लागेल. यादृष्टीने सरकार पावले उचलत आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर करतानाही याचा विचार केला आहे. अर्थसंकल्प जाहीर करण्यापूर्वी काही गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. त्यापैकी लाडकी बहिण, मोफत वीज योजना सुरू आहे. उर्वरीत योजनेबाबत आर्थिक स्थिती पाहून निर्णय घेणार आहे. निवडणूकीत ज्या घोषण केल्या होत्या. त्या पाच वर्षात टप्प्या टप्प्याने पूर्ण करू. शेजारील राज्याने घोषणा जाहीर केल्यानंतर त्यांची अंमलबजावणी केली परंतू त्यांना आता कर्ज घेण्याची वेळ आल्याचेही टोला अजित पवार यांनी लगावला.
- बहुमत असतानाही कोणतीही गोष्ट रेटून नेली नाही
अधिवेशनात सदस्यांनी प्रश्नोत्तर, लक्षवेधीतून उपस्थित केलेले अनेक प्रश्न मार्गी लावले. 7 लाख 30 कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. सर्व गोष्टी व्यवस्थीत झाल्या असून विरोधकांना बोलण्यासाठी कोणतेच मुद्दे शिल्लक नाहीत. विरोधकांकडून विधी मंडळाच्या पाऱ्यावर बसून विरोधाच्या घोषणा देवून नंतर सभागृहात बसणे, जनतेला फार काही तर काम करतो, असा केविलवणा प्रयत्न केला गेला. या उलट सरकारने बहुमत असतानाही कोणतीही गोष्ट रेटून नेली नसल्याची स्पष्टोक्ती विधानसभेतील अधिवेशनात विरोधकांच्या आरोपाबाबत अजित पवार यांनी दिली.
- मास्टरमाईंडवर कारवाई करू
संतोष देशमुख खुन प्रकरणी विचारले असता अजित पवार म्हणाले, एसआयटी, सीआयडी चौकशी सुरू आहे. यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही. ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. तेही भक्कमपणे बाजू मांडत आहेत. येथे कोणालाही पाठीशी घालण्याचा कारण नाही. चुकीचे वागले असले किंवा दोषी असेल आणि जो मास्टरमाईंड असेल त्यास शासन होणार आहे.
- शाहूवाडीतील वृक्षतोड करणाऱ्यावर कारवाई होणार
शाहूवाडी येथील सव्वाशे एकरमधील वृक्षतोड केल्या प्रकरणी विचारले असता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक असून याचा ऱ्हास होता कामा नये. वृक्षतोड प्रकरणी जे कोणी दोषी असेल. त्याच्यावर वन खात्याच्या नियमानुसार कारवाई केली जाईल. वनमंत्री आणि वन विभाग सचिव यांच्याशी संपर्क साधून याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना करू.








