वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्हय़ात अनेक शालेय विद्यार्थ्यांची मध्यान्ह आहारानंतर प्रकृती बिघडली आहे. या विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्यान्ह आहारातील डाळीच्या भांडय़ात साप पडला होता असे तपासात आढळून आले आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रशासनावर बेजबाबदारपणाचा आरोप करत निदर्शने केली आहेत. तसेच पालकांनी मुख्याध्यापकांवर हल्ला करत त्यांच्या दुचाकी वाहनाची तोडफोड केली आहे. बीरभूमच्या मयूरेश्वर येथील एका प्राथमिक शाळेत ही घटना घडली आहे. येथील विद्यार्थी मध्यान्ह आहारानंतर आजारी पडले होते. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न शाळा व्यवस्थापनाने केला होता. परंतु एका भांडय़ात साप मिळाल्यावर पालक भडकले. एक विद्यार्थी वगळता उर्वरित विद्यार्थ्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असल्याचे अधिकाऱयाने सांगितले आहे.









