पृथ्वीवरची प्राणीसृष्टी तिच्या विविध आणि अद्भूत वैशिष्ट्यांनी भरलेली आहे. अनेक प्राणी असे आहेत की ज्यांचे नाव घेतले तरी आपल्याला थरकाप सुटतो. तर असंख्य प्राणी असे आहेत, की ज्यांना आपण पवित्र मानतो. त्यांना पाळतो आणि त्यांना शुभ मानतो. आपला भारत देशही जैवबहुविधतेने नटलेला आहे. ही विविधता इतकी आहे, की तिचा ठाव घेण्याचे काम आजही केले जात आहे.
साप हा असाच एक प्राणी आहे की जो आपल्या मनात भीती निर्माण करतो. सगळेच साप विषारी नसतात पण त्यांचे एकंदर रुप असे असते की विषारी नसलेल्या सापाचीही आपल्याला भीती वाटते. बिहारमधील पश्चिम चंपारण्य जिल्ह्यात सापाची एक प्रजाती अशी आहे की जी विषारी आहे. विषारी साप जेव्हा चावतो, आणि त्याचे विष चावलेल्याच्या अंगात भिनते, तेव्हा यातना होतात. तडफड होते आणि वेळीच उपचार झाले नाहीत, तर ते चावणे जीवघेणे ठरते.
तथापि, हा साप चावल्यानंतर कोणत्याही यातना होत नाहीत. ज्याला तो चावतो त्याला बराच काळ त्याची जाणीवही होत नाही. हा साप ज्या जागी चावतो, तेथे खूणही अगदी पुसटशी राहते. केवळ निरखून पाहिल्यासच ती दिसून येते. हा साप ‘करेत‘ या नावाने परिचित आहे. तो चावल्यानंतर केवळ एखादा डास चावल्याप्रमाणे जाणीव होते आणि त्यामुळे या चावण्याकडे दुर्लक्ष केले जाते. जेव्हा त्याचे वीष अंगात भिनते, तेव्हा त्याचे सावज थेट बेशुद्ध पडते. यातना न होण्याचे कारण असे की या सापाचे वीष ‘न्यूरोटॉक्सिन’ या प्रकारातील आहे. ते रक्तात पोहचल्यानंतर आपल्या मज्जासंस्थेवरच आक्रमण करते. त्यामुळे जाणीव नष्ट होते. त्यामुळे हा करेत साप नागसापापेक्षाही घातक मानला गेला आहे.









