जगभरात मोबाईलचे वेड भलतेच वाढले आहे. सानांपासून थोरांपर्यंत सर्वांना या खेळण्याने भलतेच झपाटलेले दिसून येते. एका क्लिकवर जगाच्या कानाकोपऱयातील घटनांचे दर्शन आपल्याला घरबसल्या घडविणारे हे तंत्रज्ञान आश्चर्यकारक आहे, यात शंकाच नाही. तथापि, त्याच्या अतिआहारी जाणे माणसा-माणसातील संबंधांना घातक ठरत आहे. पतीच्या प्रेमापेक्षा मोबाईल अधिक जवळचा मानणाऱया एका पत्नीची ही कहाणी सर्वांसाठी एक धडा देणारी आहे.

गाझियाबाद येथे एका पत्नीने मोबाईलच्या प्रेमाखातर आपल्या पतीला अपमानित करण्यासही मागेपुढे पाहिले नाही. दिवसभर ती मोबाईलवरून सतत कोणाशी तरी बोलत असे. घरातल्या कुठल्याही कामाकडे तिचे लक्ष नव्हते. मग स्वयंपाकपाण्याची तर गोष्टच सोडा! त्यामुळे तिचा पती संतप्त झाला. त्याने तिला मोबाईलच्या अतिवापराबद्दल चार शब्द सुनावले. यावर तिने एकवेळ मी तुला सोडेन, पण मोबाईल सोडणार नाही, असे तडकाफडकी उत्तर दिले. शेवटी हे प्रकरण आता कौटुंबिक सल्ला केंद्रात पोहोचले आहे. पतीच्या तक्रारीनुसार पत्नी सतत आपल्या माहेरच्या माणसांशी विशेषतः आपली बहीण आणि मेहुणा यांच्याशी बोलत असते. आपल्या पतीच्या तक्रारी त्यांच्याकडे करणे हा तिचा छंद आहे. आश्चर्य म्हणजे तिची बहीण तिला तिच्या अशा स्वभावाबद्दल तिची बरीच कानउघाडणी करीत असते. तरीही तिचा हा स्वभाव बदलत नाही.
पतीने तक्रारीत म्हटले आहे, की तिच्या मोबाईल प्रेमाला कंटाळून मी तिला स्मार्टफोन ऐवजी की-पॅड असणारा फोन देण्याची तयारी केली होती. ते तिला समजताच ती अत्यंत संतप्त झाली. तिने पतीचा अपमान केला. त्यामुळे अखेरीस त्याला ही तक्रार दाखल करावी लागली आहे. मात्र, पत्नीचे आजही म्हणणे असे आहे, की एकवेळ ती पतीला सोडायला तयार आहे. पण मोबाईल सोडणार नाही. पतीपेक्षा मोबाईलवर आपले प्रेम जास्त आहे, असे तिने स्पष्टच म्हटले आहे. तिला समजावण्याचा प्रयत्न तिच्या माहेरच्या मंडळींनीही अनेकदा केला असूनही तिच्यात काहीही बदल होत नाही. समुपदेशकाने त्याच्यापरीने प्रयत्न करून दोघांना घरी पाठविले आणि पुढील तारीख दिली. तथापि, पत्नीत बदल होण्याची कोणतीही शक्यता दिसत नसल्याने ही एक न सुटणारी समस्या बनली आहे.









