खणदाळ येथील युवकाच्या खून प्रकरणाला कलाटणी : खंडणीसाठी अपहरण करून केला होता खून

बेळगाव : खंडणीसाठी खणदाळ (ता. रायबाग) येथील युवकाचे अपहरण करून त्याचा भीषण खून केल्याच्या आरोपावरून हारुगेरी पोलिसांनी यापूर्वीच सहा जणांना अटक केली आहे. आता खून झालेल्या तरुणाचा सांगाडा शोधण्यात पोलिसांना यश आले असून विशाळगड आंबाघाट परिसरात शुक्रवारी सांगाडा सापडला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे. खणदाळ येथील बाळाप्पा भूपाल आजुरे (वय 45) या तरुणाचे 18 ऑगस्ट 2022 रोजी अपहरण करण्यात आले होते. अपहरणानंतर 50 लाख रुपये खंडणी मागण्यात आली होती. बाळाप्पाचे वडील भूपाल यांचेही 30 जानेवारी 2023 रोजी अपहरण करण्यात आले होते. पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भूपाल आजुरे (वय 70) या वृद्धाचे अपहरण करून जांबियाचा धाक दाखवून 15 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. कुटुंबीयांनी 15 लाख रुपये देऊन वृद्धाची सुटका करण्याची मागणी केली. गुन्हेगारांनी पुन्हा 30 लाख रुपयांची मागणी केली. 30 लाख रुपये दिले नाहीत तर वृद्धाचा मृतदेह पहावा लागेल, असे धमकावण्यात आले.
यासंबंधी 11 फेब्रुवारी 2023 रोजी भूपालची वृद्ध पत्नी शांतव्वा ऊर्फ शांतक्का आजुरे (रा. खणदाळ) यांनी हारुगेरी पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी वासुदेव सहदेव नायक, भुजंग तुकाराम जाधव (दोघेही रा. खणदाळ, ता. रायबाग), ईरय्या सातय्या हिरेमठ (रा. केरुर, ता. चिकोडी), शिवानंद ऊर्फ शिवगोंड नानाप्पा सलखान (रा. नंदगाव, ता. अथणी) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मल्लिकार्जुन गोसावी (रा. गोकाक) व खून झालेल्या बाळाप्पाचा सख्खा भाऊ भीमाप्पा आजुरे (रा. खणदाळ) या दोघा जणांनाही अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या सहावर पोहोचली आहे. अपहरण करून खून करण्यात आलेल्या बाळाप्पाच्या सख्ख्या भावाचाही या कटात सहभाग असल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. हारुगेरीचे पोलीस निरीक्षक रविचंद्र डी. बी. व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंबाघाट परिसरात शोध घेऊन बाळाप्पाची कवटी व हाडे जप्त केली आहेत. आता ही हाडे प्रयोगशाळेला पाठविण्यात येणार आहेत. या खळबळजनक खून प्रकरणाचा छडा लावणाऱ्या पोलीस पथकाला जिल्हा पोलीसप्रमुखांनी बक्षीसही जाहीर केले होते.
शिरगुप्पीत खून…
अपहरणानंतर बाळाप्पाला शिरगुप्पी येथील एका पोल्ट्रीफॉर्मवर नेण्यात आले. तेथे त्याचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी स्कॉर्पिओतून तो आंबाघाटात नेण्यात आला. दुर्गम भागात मृतदेह फेकून देण्यात आला होता. खंडणीची रक्कम देऊनही बाळाप्पाची सुटका का झाली नाही? अशी कुटुंबीयांनी विचारणा केल्यानंतर आम्हाला घाबरून त्याने गाव सोडले आहे, असे गुन्हेगार कुटुंबीयांना सांगत होते. अखेर त्याचा खून झाल्याचे उघड झाले आहे.









