जैन मुनी कामकुमार महाराजांच्या हत्या प्रकरणाची चौकशी सुरू : आज वरिष्ठ अधिकारी करणार तपास
बेळगाव ; हिरेकोडी, ता. चिकोडी येथील नंदी पर्वताश्रमाचे जैन मुनी कामकुमार महाराजांच्या हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीआयडीचे पथक चिकोडी येथे दाखल झाले आहे. सीआयडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून मंगळवारी सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी चिकोडीला येणार आहेत. पोलीस अधीक्षक वेंकटेश, पोलीस उपअधीक्षक एच. डी. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील पथकात सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. रविवारी हे अधिकारी चिकोडीत दाखल झाले आहेत. नंदीपर्वत आश्रमाला भेट देऊन पथकातील अधिकाऱ्यांनी या खळबळजनक हत्या प्रकरणासंबंधी स्थानिक माहिती जमविली आहे. चिकोडीचे पोलीस अधीक्षक बसवराज यलीगार यांनी आजवर या प्रकरणाचा तपास केला आहे. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडूनही या प्रकरणासंबंधीची माहिती घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे सोपविण्याची औपचारिकताही पूर्ण करण्यात आली आहे. आता पूर्ण प्रमाणात सीआयडीचे अधिकारी तपासाला लागले आहेत. मुनी महाराजांच्या हत्येप्रकरणी नारायण माळी व हसनसाब ढालायत या दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. सात दिवस पोलीस कोठडीत घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली आहे. सध्या त्यांना हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धतेत ठेवण्यात आले असून सीआयडीचे पथक कारागृहालाही भेट देऊन त्यांची चौकशी करणार आहे. 5 जुलै रोजी रात्री कामकुमार मुनी महाराजांची भीषण हत्या झाली होती. त्याच दिवशी रात्री रायबाग तालुक्यातील कटकभावी येथील निकाम्या कूपनलिकेत त्यांच्या मृतदेहाचे तुकडे टाकण्यात आले होते. विधिमंडळ अधिवेशनात भाजपने हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची मागणी केली होती. सरकारने तपास सीआयडीकडे सोपविला आहे.
वरिष्ठ अधिकारी चिकोडीला येणार
दोन दिवसांपासून सीआयडीचे अधिकारी या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. मंगळवारी सीआयडीचे डीआयजी मधुकर पवार चिकोडीला येणार असून दोन दिवसात आणखी काही वरिष्ठ अधिकारी दाखल होणार आहेत.









