अमेरिकेच्या टेक्सासमधील धक्कादायक घटना : डेअरी फार्ममध्ये यंत्रबिघाडामुळे विस्फोट
वृत्तसंस्था / डिमिट
अमेरिकेच्या टेक्सास येथील एका डेअरी फार्ममध्ये ठिणगी पडून लागलेल्या भीषण आगीत 18 हजार गायींचा मृत्यू झाला आहे. डिमिट शहरातील साउथ फोर्क डेअरीत यंत्रांमधील बिघाडामुळे हा विस्फोट होताच तेथे आग लागली. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. दुर्घटनेनंतर फार्ममध्ये असलेल्या काही गायींना वाचविण्यात यश आले आहे.

यंत्र ओव्हरहीट झाल्याने ही दुर्घटना घडली असावी. अधिक वापरामुळे यंत्र खूपच तापून त्यातून मिथेन वायू बाहेर पडू लागला. यामुळे ठिणगी पडून विस्फोट झाला असल्याची शक्यता पोलीस अधिकारी सल रिवेरा यांनी व्यक्त केली आहे. विस्फोटावेळी गायींना एका हिस्स्यात बांधण्यात आले होते.
ही दुर्घटना हादरवून टाकणारी आहे. यापूर्वी कधीच असे घडले नव्हते. याप्रकरणी आम्ही तपास करत आहोत असे उद्गार डिमिटचे महापौर रोजर मालोन यांनी काढले आहेत. साउथ फोर्क डेअरी फार्म टेक्सासच्या पॅस्ट्रो काउंटीत आहे. पॅस्ट्रो ही टेक्सासमधील सर्वाधिक डेअरी उत्पादक काउंटीपैकी एक आहे. पॅस्ट्रो काउंटीत 30 हजारांहून अधिक गायी पाळल्या जात असल्याचे सांगण्यात येते.
कोट्यावधी डॉलर्सचे नकुसान
मृत्युमुखी पडलेल्या बहुतांश गायींमध्ये होल्स्टीन प्रजातीच्या गायींचा समावेश होता. या मोठ्या फार्ममधील 90 टक्के पशूधन या दुर्घटनेमुळे संपुष्टात आले आहे. या फार्ममधील प्रत्येक गायीची किंमत 2 हजार डॉलर्स इतकी होती. या दुर्घटनेमुळे कंपनीचे कोट्यावधी डॉलर्सचे नुकसान झाले आहे.









