उघडकीस आलेल्या धक्कादायक माहितीनंतर नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा : आणखी मशिन्स उपलब्ध करण्याची मागणी
बेळगाव : शहराचा विस्तार वाढत चालला आहे. 58 वॉर्ड असले तरी अनेक उपनगरे झाली असून त्यांची स्वच्छता तसेच विविध समस्या आवासून उभ्या आहेत. कचऱ्याची उचल वेळेत केली जात नाही. याचबरोबर ड्रेनेजचे पाणी देखील पसरत आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या डासांमुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून डेंग्यु-मलेरियासारख्या आजारांची अनेकांना लागण होत आहे. डासांच्या निर्मूलनासाठी मनपाकडे केवळ एकच फॉगिंग मशिन उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. यामुळे नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी तातडीने फॉगिंग मशिन उपलब्ध कराव्यात, अशी मागणी केली. सध्या शहरामध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डासांना प्रतिबंध करण्यासाठी फवारणी करणे गरजेचे आहे. मात्र महानगरपालिकेमध्ये केवळ दोनच फॉगिंग मशिन्स आहेत. त्यामधील एक मशिन बंद आहे, अशी माहिती नगरसेवकांनी उघडकीस आणली. त्यानंतर तातडीने आणखी फॉगिंग मशिन्सची मागणी करण्यात आली. महानगरपालिका आयुक्तांनी आणखी 12 फॉगिंग मशिन्ससाठी प्रस्ताव दिला आहे. त्या लवकरच उपलब्ध होतील, असे ठोस आश्वासन आयुक्तांनी नगरसेवकांना दिले आहे.
साथीचे आजार उद्भवत आहेत. पाण्याचा निचरा तसेच कचऱ्याची उचल वेळेत होत नाही. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याबाबत नगरसेवक रवी साळुंखे यांनी शहरामध्ये प्रत्येक वॉर्डात औषधांची फवारणी करावी, अशी मागणी करण्यात आली. आयुक्तांनी मशीन्स उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले. मात्र फॉगिंग मशिन किती आहेत याची आकडेवारी विचारली असता केवळ दोनच असून त्यामधील एक बंद असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. या घटनेनंतर शहरामध्ये किमान 20 तर फॉगिंग मशिन्स आवश्यक आहेत. कारण 58 वॉर्ड असून सर्वत्र फवारणी करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तातडीने फॉगिंग मशिन्स उपलब्ध करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. त्यावर तातडीने आयुक्तांनी 12 फॉगिंग मशिन उपलब्ध केल्या जातील, असे सांगितले. तशी सूचना देखील आरोग्य विभागाला दिल्या आहेत. यामुळे आता शहरातील विविध वॉर्डांत फवारणी केली जाईल, अशी शक्यता आहे.









