कोल्हापूर :
कोल्हापूर ते प्रतिपंढपूर नंदवाळ या पायी दिंडीसाठी 70 किलो चांदीने बनवलेल्या नक्षीदार रथाचे सोमवारी रात्री लोकार्पण करण्यात आला. आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह वारकरी संप्रदायातील मान्यवरांच्या हस्ते आणि वारकरी, टाळकरी, विणेकरी यांच्या उपस्थितीत श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी भक्त मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पोवार यांनी रथ स्वीकारला.
यावेळी वारकऱ्यांनी विठ्ठल, ज्ञानेश्वरांचा नामजप करत दसरा चौक मंत्रमुग्ध कऊन सोडला. येत्या 6 जुलै रोजी असलेल्या आषाढी एकादशीनिमित्त आयोजित कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ या पायी दिंडी हा चांदीचा रथ दाखल करण्यात येईल, असे पोवार यांनी यावेळी सांगितले.
जगद्गुरु तुकोबारायांचे विद्यावंशज चैत्यन्य सदगुरु गोपाळ (अण्णा) वासकर महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन कऊन चांदीचा रथ लोकार्पण सोहळ्याला सुऊवात केली. यावेळी उपस्थित वारकरी व विणेकऱ्यांनी अभंग म्हणून रथ लोकार्पणात भक्तीरस पाझरला. यानंतर रथासाठी 70 किलो चांदी दिल्याबद्दल राजेश क्षीरसागर यांचा वारकऱ्यांच्या वतीने सत्कार केला. सहा महिने परीश्रम घेऊन चांदीचा रथ साकारलेले चांदी कारागीर संजय कृष्णाजी पाटील यांचाही सत्कार केला. पाटील यांनी मुळच्या नक्षीदार लाकडी रथाला चांदीपासून बनवलेले 32 गेज जाडीचे नक्षीदार भाग लावले आहे. दिंडीत रथ वाहून नेण्यासाठी पॉप्युलर स्टील वर्क्सचे राजू जाधव यांनी चार चाकी ट्रॉली तर रथ ठेवण्यासाठी संदीप पोवार व सूर्यकांत पोवार यांनी कळंब्यातील एक गुंठा जागा दिली आहे.
- वारकरी महामंडळाला जरुर निधी देऊ : क्षीरसागर
माझी आई मालन क्षीरसागर व वडील विनायकराव क्षीरसागर यांच्या स्मरणार्थ चांदीचा रथ बनवला आहे. त्यांनी दिलेल्या संस्कारामुळे रथ बनवू शकलो, असे सांगून आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, सोशल मिडीयामुळे तऊणाई चुकीच्या वाटेला चालली आहे. त्यांना तिकडे जाण्यापासून रोखण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा लागेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकरी महामंडळाची स्थापना कऊन वारकऱ्यांना आधार दिला आहे. भविष्यात महामंडळासाठी सरकारकडून जऊर निधी दिला जाईल. असा सरकारच्या वतीने क्षीरसागर यांनी शब्द दिला.
- प्रत्येकाने आई–वडीलांच्या नावाने चांगले कार्य करावे…
क्षीरसागर यांनी आई–वडीलांच्या स्मृतिप्रित्यर्थ बनवलेला रथ प्रत्यक्ष कोल्हापूर–नंदवाळ दिंडीत पाहताना सर्वाच्या मनात आपणही आई–वडींच्या नावाने काही करावे, असे येईल. त्याकडे दुर्लक्ष करत आई–वडीलांच्या नावाने चांगले कार्य करण्यावर लक्ष केंद्रीत करावे. दिंडीत असणाऱ्या ज्ञानेश्वरीतील ज्ञान वाहून नेण्याचे काम आता नवा चांदीचा रथ करणार हेच मुळात आनंददायी असेल असे चैतन्य सदगुरु गोपाळ (अण्णा) वासकर महाराज यांनी सांगितले.
- रथाने दिंडीचे भाग्य उजळले…
आता प्रत्येक आषाढी एकादशीला नंदवाळमधील विठ्ठल मंदिराकडे जाताना चांदीचा रथ ज्ञानेश्वरांची मूर्ती, ज्ञानेश्वरी, त्यांच्या पादुका वाहून नेणार ही मोठी विलक्षण घटना असणार आहे. या रथाने दिंडीचे भाग्य उजळले आहे. असे आनंदनाथ महाराज सांगवडेकर यांनी सांगितले. नंदवाळचे तानाजी निकम म्हणाले, नंदवाळमधील विठ्ठलाच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांसाठी वाहनतळ करणे गरजेचे झाले आहे. शासनाच्या माध्यमातून गायराण जमिन मिळाली तर तेथे वाहनतळ करता येईल. आळंदी देवस्थानचे बाळासाहेब महाराज चोपदार यांचेही भाषण झाले. यावेळी जगदगुरु तुकोबारायांचे 12 वे वंशज गुरु अनिकेत महाराज मोरे, गुरु चैतन्य महाराज, माजी आमदार सुरेश साळोखे, शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, बांधकाम व्यावसायिक जयेश कदम, चेंबर ऑफ कॉमर्स–कोल्हापूरचे अध्यक्ष संजय शेटे, प. महा. देवस्थान व्यवस्थापन समिती माजी कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, त्यांचे चिरंजीव ऋतुराज, पुष्कराज, सून दिशा यांच्यासह शेकडो वारकरी व भाविक उपस्थित होते. अंकुश निपाणीकर यांनी सुत्रसंचालन केले.








