राहुल गांधींवरील कारवाईचा काँग्रेसकडून निषेध
प्रतिनिधी/ बेंगळूर
विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना बुधवारी बेंगळूरमध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपने आंदोलन केले. एकीकडे काँग्रेसने राहुल गांधी यांच्याविरुद्ध भाजप सुडाचे राजकारण करीत असल्याच आरोप करत फ्रीडम पार्कवर मूक आंदोलन केले. तर दुसरीकडे भाजपने जैन मुनी हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे, असा आरोप करून विधानसौध आवारात धरणे आंदोलन छेडले.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांना खासदारपद रद्द करण्यात आल्याने याविरुद्ध दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली होती. याविरोधात काँग्रेस नेत्यांनी फ्रीडम पार्कवर मूक आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारविरोधात निषेध नोंदविणारे फलक हाती धरण्यात आले होते. तोंडाला काळ्या फिती बांधून काँग्रेस नेते आंदालनात सहभागी झाले. राहुल गांधी यांचे सत्याचे बोल सहन न झाल्याने पंतप्रधानांनी त्यांच्याविरुद्ध सुडाचे राजकारण सुरू केले आहे. राहुल गांधी यांचे खासदारपद रद्द आणि झालेल्या शिक्षेचे देशभरात खंडन केले जात आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. मंत्री एम. सी. सुधाकर यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, पदाधिकारी, आमदार व नेतेही आंदोलनात सहभागी झाले होते. षड्यंत्राद्वारे सत्य लपविता येणार नाही, पाताळयंत्री भाजपचा धिक्कार, लोकशाहीविरोधी भाजपचा धिक्कार अशा घोषणेचे फलक काँग्रेस नेत्यांनी प्रदर्शित केले.
राज्यातील जनता राहुल गांधींच्या पाठिशी : शिवकुमार
राहुल गांधी यांच्याविरुद्ध अनावश्यकपणे मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. त्यांना खासदारपदावरून अपात्र ठरविण्यात आले आहे. राज्यातील सर्व जनता राहुल गांधींच्या बाजूने उभी राहणार आहे. देशाची एकता, अखंडता आणि शांतता अबाधित राहण्याठी धडपडणाऱ्या राहुल गांधी यांच्या पाठिशी जनतेने उभे रहावे, अशी हाक उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली. आंदोलनानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
केंद्रातील भाजप सरकार मागील नऊ वर्षांत नेहरु कुटुंबावर सातत्याने टीका करत आले आहे. भाजप नेत्यांनी अनेक मानहानी होईल, अशी भाषणे केली आहेत. मात्र, त्यांना कधीही शिक्षा झालेली नाही. मात्र, राहुल गांधींवर कोलारमधील भाषावरून कारवाई करण्यात आली आहे. 2024 मधील लोकसभा निवडणुकीवेळी भाजपला सत्ता गमावण्याची भीती असल्याने भाजपने राहुल गांधींविरुद्ध षड्यंत्र रचले आहे, असा आरोपही शिवकुमार यांनी केला.

जैन मुनींच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याची भाजपची मागणी
जैन मुनींच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी करत भाजपच्या आमदारांनी विधानसौध आवारातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन छेडले. त्यानंतर भाजप नेत्यांनी राजभवनपर्यंत पदयात्रा काढत राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना निवेदन दिले. बुधवारी सकाळीच आंदोलन सुरू करण्यात आल्याने दुपारपर्यंत विधिमंडळातील दोन्ही सभागृहांत भाजपच्या आमदारांची गैरहजेरी दिसून आली. राज्यपालांना निवेदन दिल्यानंतर 12 वाजता भाजपचे आमदार सभागृहांमध्ये दाखल झाले.
राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे. जैन मुनींच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी भाजपने केली. आंदोलनावेळी भाजप आमदारांनी राज्य काँग्रेस सरकारविरोधात धिक्काराच्या घोषणा दिल्या.
माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, माजी मंत्री आर. अशोक, अरग ज्ञानेंद्र, व्ही. सुनीलकुमार, बी. वाय. विजयेंद्र यांच्यासह भाजपचे सर्व आमदार व विधानपरिषद सदस्य आंदोलनात सहभागी झाले. त्यानंतर राजभवनपर्यंत पदयात्रा काढून राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली असून राज्य सरकारला यासंबंधी योग्य निर्देश द्यावेत, अशी मागणी राज्यपालांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
मंगळवारी विधानसभेमध्ये भाजपने धरणे आंदोलन छेडले होते. जैन मुनींच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याची मागणी भाजपने केली होती. मात्र, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याची आवश्यकता नाही. राज्यातील पोलीस तपास करण्यास समर्थ आहेत, असे सांगितले होते. त्यामुळे भाजपने बुधवारी विधानसौधबाहेर आंदोलन छेडले.
राज्यात ‘जंगलराज’ : बोम्माई
राज्यपालांना निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. राज्यात ‘जंगलराज’ सुरू झाले आहे. सर्वसामान्यांना भितीच्या छायेखाली वावरावे लागत आहे. जैन मुनींची हत्या, कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक, सीईओची हत्या व इतर घटना दिवसाढवळ्या घडत आहे. खुन्यांना कोणतीही भीती राहिलेली नाही. पोलिसांवरही दबाव आणला जात आहे. वाळू माफियांना रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसाचाही हत्या करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी सरकारपुढे मान झुकवून उभे आहेत, असा आरोपही बोम्माई यांनी केला.
सभागृहातील खुर्च्या रिकाम्या
बुधवारी सकाळी विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाजाला प्रारंभ होताच विरोधी पक्ष भाजप आमदारांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. निजदचे मोजकेच आमदार आणि सत्तधारी काँग्रेसचे आमदार सभागृहांमध्ये दिसून आले. काँग्रेसचे काही आमदारही मौन आंदोलनात सहभागी झाल्याने सत्ताधारी पक्षातील आमदारांची उपस्थितीही पूर्ण प्रमाणात नव्हती. सकाळी विधानसभेत कामकाजाला सुरुवात होताच खोबऱ्याला आधारभूत दर निश्चित करण्यासंबंधी उपस्थित झालेल्या प्रश्नावर मंत्री शिवानंद पाटील यांनी उत्तर दिले. त्यानंतर राज्यपालांच्या भाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा सुरू करण्यात आली.









