फिलिपाईन्सच्या तटरक्षक दलाच्या जहाजाला टक्कर
वृत्तसंस्था/ मनीला
चिनी तटरक्षक दलाच्या एका जहाज आणि ‘मिलिशिया’ नौकेने रविवारी दक्षिण चीन समुद्रातील एका वादग्रस्त किनाऱ्यावर फिलिपाईन्सच्या जहाजांना टक्कर मारली आहे. फिलिपाईन्सने चीनच्या या कृत्याला ‘धोकादाय आणि बेजबाबदार तसेच अवैध’ ठरविले आहे.
सेकंड थॉमस किनाऱ्यावर झालेल्या घटनांमध्ये झालेल्या हानीबद्दल फिलिपाईन्सच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली नाही. फिलिपाईन्सचा मित्रदेश अमेरिकेने या घटनेप्रकरणी चीनची निंदा केली आहे. चीनचे हे कृत्य आमच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे फिलिपाईन्सच्या सरकारने म्हटले आहे. तर मनीला येथील चिनी दूतावासाने याप्रकरणी कुठल्याही प्रकारची टिप्पणी करणे टाळले आहे.
चीनने अयंगिन किनाऱ्यावर केलेल्या या आगळीकीची अमेरिका निंदा करतो, चीनच्या या कृत्यामुळे फिलिपाईन्सच्या नागरिकांचे जीवन धोक्यात आले होते, असे उद्गार मनीला येथील अमेरिकेचे राजदूत मॅरीके कार्लस यांनी काढले आहेत. फिलिपाईन्सचे सार्वभौमत्व आणि अधिकारक्षेत्राचे उल्लंघन करत चिनी तटरक्षक दल तसेच चिनी सागरी मिलिशियाच्या धोकादायक, बेजबाबदार आणि अवैध कारवायांची कठोर शब्दांत निंदा करत असल्याचे फिलिपाईन्सच्या सरकारने म्हटले आहे.
रविवारी सकाळी झालेल्या पहिल्या घटनेत चीनच्या तटरक्षक दलाचे जहाज 5203 ने फिलिपाईन्सच्या तटरक्षक दलाच्या नौकेला टक्कर मारली. चीनच्या या आगळीकीमुळे चालक दलाचे सदस्य संकटात सापडले होते. तर दुसऱ्या घटनेत फिलिपाईन्सच्या तटरक्षक दलाला डाव्या बाजूने चिनी मिलिशिया जहाज 00003 ने टक्कर मारल्याचे सांगण्यात आले.
जगातील सर्वात व्यग्र सागरी व्यापारी मार्गांपैकी एका मार्गावर चीनने ही आगळीक केली आहे. दक्षिण चीन समुद्रात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या क्षेत्रीय वादांमध्ये हा सर्वात नवा घटनाक्रम आहे. या सागरी भागावरून चीन, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, मलेशिया, तैवान आणि ब्रुनेई यांच्यात वाद सुरू आहे.









