वृत्तसंस्था/ दुबई
‘ग्लोबल चेस लीग’च्या नवव्या दिवशी संभाव्य विजेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्यांच्यावर पराभव स्वीकारण्याची पाळी आली. यात ‘चिंगारी गल्फ टायटन्स’ने ‘मुंबा मास्टर्स’ला 12-3 असे नमविले, तर ‘एसजी अल्पाईन वॉरियर्स’ला त्रिवेणी कॉन्टिनेन्टल किंग्स’कडून चकीत व्हावे लागले. या स्पर्धेत दुसऱ्यांदा जगात अग्रक्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला लेवॉन एरोनियनकडून पराभूत व्हावे लागले आहे.
विश्वनाथन आनंदचा मित्र प्रख्यात टेनिसपटू महेश भूपतीने या स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन ‘एसजी अल्पाईन वॉरियर्स’ आणि ‘त्रिवेणी कॉन्टिनेन्टल किंग्स’ यांच्यातील सामन्याचा पहिली चाल करून शुभारंभ केला. ‘त्रिवेणी कॉन्टिनेन्टल किंग्स’ने 15 गुणांनिशी आघाडीवर असलेल्या दोन संघांसह स्थान मिळविले आहे. यामुळे पहिल्या टेक महिंद्रा ग्लोबल चेस लीगच्या जेतेपदासाठीची शर्यत आणखी रंगतदार बनली आहे.
चिंगारी गल्फ टायटन्स विरुद्ध मुंबा मास्टर्स सामन्यात विदित गुजरातीवर दुबोव्हने मात केली, तर शखरियार मामेदयारोव्ह व आलेक्झांडर ग्रिसचूक यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर आलेक्झांडर कॉस्टेनियूक व पोलिना शुवालोव्हा यांनीही विजय मिळविल्याने मुंबा मास्टर्सची परिस्थिती आणखी बिकट झाली. मुंबाचे शेवटचे दोन सामने भरपूर प्रयत्न करूनही बरोबरीत राहिले. त्यांच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या प्रयत्नांना यामुळे धक्का बसला आहे.
दुसऱ्या लढतीत आघाडीवर राहिलेल्या एसजी अल्पाईन वॉरियर्सला त्रिवेणी कॉन्टिनेन्टल किंग्सने मोठा धक्का दिला. त्यात मॅग्नस कार्लसनला लेव्हॉन एरोनियनविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. वॉरियर्सच्या डी. गुकेशने यू यांगईवर मात केली असली, तरी वुई यीने अर्जुन एरिगायसीला पराभूत केल्याने त्रिवेणी कॉन्टिनेन्टल किंग्सने लगेच उसळी घेतली. प्रज्ञानंदने जवळजवळ पराभूत होण्याच्या स्थितीतून बाहेर सरून जोनास बेजेरेला नमवून दाखविले, तर एलिझाबेथ पायट्झ आणि सारा खादेम तसेच इरिना क्रश व कॅटेरिना लाग्नो यांच्यातील सामने बरोबरीत सुटले.
मुंबा मास्टर्सने त्यानंतर गंगा ग्रँडमास्टर्सला 10-4 असे नमविले. त्यात जावोखिर सिंदारोव्हने मुंबाला चांगली सुरुवात करून देताना अँड्रे एसिपेन्कोला हरविले, तर विश्वनाथन आनंद व मॅक्झिम वाशियर-लाग्रेव्ह यांच्यातील सामना अनिर्णीत राहिला. अन्य लढतींत कोनेरू हंपीने हाऊ यिफानला पराभूत केले, विदित गुजराती व लेनियर दोमिंगेझ पेरेझ आणि हरिका द्रोणवल्ली व बेला खोटेनाशविल्ली तसेच आलेक्झांडर ग्रिसचूक व रिचर्ड रॅपोर्ट यांच्यातील सामने बरोबरीत सुटले. शेवटच्या लढतीत त्रिवेणी कॉन्टिनेन्टल किंग्सने बालन अलास्कन नाइट्सवर 10-9 अशा फरकाने मात केली.