वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वहाब रियाजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. वहाब मागील तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळला नव्हता. जगभरातील लीग क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचे स्पष्ट केले आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाला याबाबत त्याने माहिती दिली आहे.
दरम्यान, वहाबने ट्विटवरून आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निरोप घेत असल्याची माहिती चाहत्यांना दिली. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. क्रिकेट कारकिर्दीतील अविश्वसनीय प्रवासानंतर मी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पीसीबी, माझे कुटुंब, प्रशिक्षक, मार्गदर्शक, सहकारी, चाहते आणि मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे खूप खूप आभार. येणारा काळ फ्रँचायझी क्रिकेटच्या दृष्टीने रोमांचक असेल,’ असे ट्विट त्याने केले आहे.
डावखुरा वेगवान गोलंदाज वहाब रियाजने 2008 मध्ये पाकिस्तानकडून पदार्पण केले होते. आपल्या कारकिर्दीत त्याने 27 कसोटी, 91 एकदिवसीय आणि 36 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. 2020 मध्ये त्याला पाकिस्तानकडून टी-20 सामना खेळण्याची शेवटची संधी मिळाली. कसोटीत 83, वनडेत 120 आणि टी-20 मध्ये 34 विकेट्स आहेत. तसेच वहाबने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही 1200 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, वहाबची वनडेतील सर्वोत्तम कामगिरी भारताविरुद्धच झाली आहे. 2011 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने 46 धावांत भारताचे 5 विकेट्स घेतले होते. यात वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, युवराज सिंग आणि धोनीसारख्या मोठ्या खेळाडूंचा समावेश होता.









