हॅरी ब्रुकची कसोटी मालिकेतून माघार : ब्रकुच्या जागी डॅन लॉरेन्सची संघात वर्णी
वृत्तसंस्था/ लंडन
भारताविरुद्ध 25 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक भारताविरुद्ध कसोटी मालिकेत सहभागी होणार नाही. ब्रूक वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतत असल्याचे इंग्लिश क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, ब्रुकच्या जागी डॅन लॉरेन्सला इंग्लंड संघात स्थान देण्यात आले आहे.
हॅरी ब्रुक वैयक्तिक कारणास्तव तत्काळ इंग्लंडला परतत आहे. तो वैयक्तिक कारणास्तव भारत दौऱ्यात इंग्लंड संघाचा भाग नसेल. ब्रुकने आपल्या कुटुंबाची प्रायव्हसी ठेवण्याची विनंती केली आहे. आमचीही इच्छा आहे की, त्याच्या कुटुंबाच्या प्रायव्हसीची काळजी घेतली जावी, असे निवेदन ईसीबीने केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून ब्रुक सतत चर्चेत राहिला आहे. आतापर्यंत 12 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 4 शतक आणि 7 अर्धशतकांच्या मदतीने 1181 धावा केल्या आहेत. ब्रुकने माघार घेतल्यानंतर ईसीबीने तत्काळ त्याच्या जागी डॅन लॉरेन्सला संधी दिली आहे. लॉरेन्सला भारतात खेळण्याचा अनुभव आहे. 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केल्यापासून लॉरेन्सने आतापर्यंत 11 कसोटी सामन्यांमध्ये 551 धावा केल्या आहेत. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत डॅनला संधी मिळते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
पहिल्या दोन कसोटीसाठी इंग्लिश संघ – बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, शोएब बशीर, डॅन लॉरेन्स, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स, टॉम हार्टले, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रुट आणि मार्क वूङ









