वृत्तसंस्था/ सिडनी
विश्वचषक स्पर्धेचा थरार यंदा भारतात रंगणार आहे. या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तसेच, भारतीय संघाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. मात्र, या स्पर्धेपूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या गोटातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्टार फलंदाज ट्रेविस हेड दुखापतग्रस्त झाला असून तो विश्वचषकामध्ये खेळण्याबाबत सांशकता निर्माण झाली आहे. तसेच तो भारताविरुद्ध मालिकेत खेळणार नसल्याचेही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले आहे.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळल्या गेलेल्या चौथ्या वनडे सामन्यादरम्यान फलंदाजी करताना ट्रेविस हेडच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती. आफ्रिकेचा गोलंदाज गेराल्ड कोएट्जी याचा आखुड टप्प्याचा चेंडू हेडच्या डाव्या हाताच्या ग्लोव्ह्जवर जाऊन लागला. त्यानंतर वेदनेने तळमळत असलेल्या ंहेडने मैदान सोडले. तो रिटायर हर्ट होऊन तंबूत परतला आणि फलंदाजीसाठी पुन्हा आला नाही. खरं तर, हेडने या सामन्यात 11 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 17 धावा केल्या होत्या. मात्र, त्याच्या दुखापतीमुळे आता ऑस्ट्रेलिया संघाच्या चिंता वाढवल्या आहेत. अशात हेड विश्वचषक स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, हेडचे स्कॅनिंग करण्यात आले असून दुखापत फारशी गंभीर नसल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले आहे. सध्या त्याच्यावर शस्त्रक्रियेची गरज नसली तरी डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. यामुळे विश्वचषकातील काही सामने खेळू शकेल की नाही याबाबत काही दिवसात खुलासा करण्यात येईल असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे. भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी रविवारी संघाची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये गेले काही दिवस दुखापतग्रस्त असलेल्या कर्णधार पॅट कमिन्स, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क यांनी पुनरागमन केले. आता, स्टार फलंदाज हेडच जखमी झाल्याने पुन्हा ऑसी संघाच्या चिंता वाढल्या आहेत.