जत प्रतिनिधी
जत तालुक्यातील येळवी येथे वादळी वाऱ्याने विजेची तार तुटून अंगावर पडल्याने मेंढीसह दोन शेळ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता घडली. तर तालुक्यातील उमदी सुसलाद, विठ्ठलवाडी परिसराला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वादळी वारे व गारपीटीचा जोरात तडाखा बसला. शुक्रवार दुपारी पाऊण तास पाऊस झाला. त्यातच वादळी वारे व गारपीट झाल्याने सात-आठ जणांचे घराचे पत्रे, विजेचे डांब व झाडे उन्मळून पडले आहेत.
शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास तालुक्यातील येळवी भागात जोराचा वादळी वारे सुटले. ईश्वर डोंबाळे व त्यांचा मुलगा पांडुरंग डोंबाळे हे शेतातच शेळ्या व मेंढया चारत होते. सहाच्या सुमारास पाऊस व वादळी वारे सुरू झाल्याने ईश्वर डोंबाळे हे त्यांच्या शेळ्या व मेंढया घेवून घराकडे जात असताना अचानक वादळी वाऱ्याने विजेची तार तुटली व शेळ्या व मेंढ्याच्या अंगावर पडली. यात एक मेंढी व दोन शेळ्यांचा विजेच्या धक्याने जागीच मृत्यू झाला. सुदैवाने ईश्वर डोबांळे हे बचावले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील वंदना सचिन माने, कोतवाल बाळासो चव्हाण, वायरमन सहाय्यक बापू चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली.
उमदी, विठ्ठलवाडी येथे वादळी वाऱ्याचा तडाका
दरम्यान, जत तालुक्यातील उमदी, सुसलाद विठ्ठलवाडी येथे दुपारी वादळी वाऱ्याचा जोरदार तडाका बसला. या भागात जास्तीत जास्त शेतकरी कुटुंब राहतात. द्राक्ष बाग याठिकाणी मोठया प्रमाणावर आहे. यावर्षी द्राक्षाला दर कमी असल्याने बेदाणा शेड उभारून बेदाणे करण्याकडे कल वाढला होता. मात्र बहुतांशी शेतकऱ्यांचा बेदाणा विक्रीसाठी गेला आहे. केवळ १० टक्के लोकांच्या बेदाणा शेड मध्ये होता. त्यांचे गारपीट पावसाने नुकसान झाले आहे. विठ्ठलवाडी येथील बाळू विठोबा बामणे यांच्या घराचे पत्रे उडून गेले आहेत. तर परशुराम शंकर सुर्यवंशी यांची संपुर्ण द्राक्ष बाग कोसळली आहे. तसेच वीजेचे डांब आणि झाडेही पडली आहेत. या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस व वीजेचे डांब कोसळल्याने रात्रभर वीजपुरवठा बंद होता.
Previous Articleमे महिन्यात पूर्व भारताला उष्णतेच्या लाटेचा तडाखा
Next Article सांगली बाजार समितीत महाविकास आघाडीची विजयी सलामी








