सुदैवाने जीवितहानी नाही : शेडचे नुकसान
बेळगाव : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला संततधार पाऊस व वाऱ्यामुळे शहरातील जुने वृक्ष मोडून पडत आहेत. शहापूर स्मशानभूमी आवारातील वृक्ष अंत्यविधी निवारा शेडवर कोसळल्याने शेड भुईसपाट झाले आहे. यावेळी शेजारील एका निवाऱ्यामध्ये अंत्यविधी सुरू होता. मात्र, पावसामुळे उपस्थित नागरिक दूरवर थांबल्याने केवळ सुदैवानेच मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती समजताच महापौर मंगेश पवार यांनी शहापूर स्मशानभूमीला भेट देऊन शेडची पाहणी केली. शहापूर स्मशानभूमीतील पत्रे व शेड बदलण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. 21 वर्षांपूर्वी मुक्तीधाम सेवा सुधारणा मंडळ आणि गौड सारस्वत ब्राह्मण समाज यांच्यावतीने स्मशानभूमीतील पहिला निवारा शेड उभारण्यात आला होता. गेल्या तीन वर्षांपूर्वी त्यावर पत्रे बसविण्यात आले होते.
मात्र, तेव्हापासून सदर पत्रे गंजल्याने त्यातून पावसाचे पाणी पडत होते. याबाबत अनेक वेळा महापालिकेकडे पाठपुरावा करून देखील दुर्लक्ष करण्यात आल्याने संपूर्ण निवारा शेड धोकादायक परिस्थितीत होते. चार दिवसांपूर्वी मनपा आयुक्त शुभा बी. यांनी स्मशानभूमीला भेट देऊन धोकादायक शेडची पाहणी केली होती. त्यातच गुरुवारी दुपारी एका निवाऱ्याखाली अंत्यविधी सुरू असताना दुसऱ्या शेडवर झाड कोसळून पडले. त्यामुळे निवारा भुईसपाट झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे स्मशानभूमीत उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी तातडीने नवीन शेड उभारण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. केवळ सुदैवानेच या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.









