मोदी-ठाकरे यांची युतीबाबत झाली होती चर्चा ; राऊतांनी घातला खोडा
प्रतिनिधी/ नवी दिल्ली, मुंबई
दिल्लीत ठाकरे आणि पंतप्रधानांबरोबर झालेल्या भेटीत ठाकरे यांनी युतीच्या बाजूने सकारात्मकता दाखविली होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास आपली त्याला मान्यता असेल, आपण त्यांचे स्वागत करू, असेही ठाकरे म्हणाले होते. मी युतीसाठी प्रयत्न करतोय, आपणही प्रयत्न करा असे म्हणणारे ठाकरे यांनी युतीसाठी प्रयत्न करायला सांगायचे आणि संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर बैठका घ्यायच्या. त्यामुळे युतीत अडचणी आल्या. युतीसाठी उद्धव ठाकरे सकारात्मक होते, पण त्यांच्याभोवती असलेल्या चौकडीचा युतीला विरोध होता. त्यामुळेच शिवसेनेत फूट पडल्याचे सिद्ध होत आहे, असे एकामागून एक गौप्यस्फोट शेवाळे यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी बारा खासदारांसह दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये लोकसभा अध्यक्षांना शिवसेनेचे गटनेते राहुल शेवाळे असल्याचे पत्र प्रतोद भावना गवळी यांच्यावतीने देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर साधारण चर्चेनंतर त्यांनी पत्रकार परिषदेची सूत्रे राहुल शेवाळे यांच्याकडे दिली.
राहुल शेवाळे म्हणाले, 2019 चा शिवसेनेचा वचननामा उद्धव ठाकरे यांनी बनवला होता. मात्र यात उल्लेख असलेल्या एकाही मुद्याचा महाविकास आघाडीच्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅममध्ये समावेश नव्हता. आमदारांच्या बंडानंतर शिवसेना खासदारांना वर्षावर बैठकीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी आम्ही सांगितलं की एनडीएसोबत युती करा, त्यावर ‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर मी तुमची भूमिका आनंदाने स्वीकारेन’ असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.
खासदार शेवाळे म्हणाले, मलाही युती करायची होती, असं उद्धव ठाकरे आम्हाला म्हणाले होते. भाजपशी युती करण्याविषयी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली होती. त्यांनीच आपल्याला युतीबाबत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करायला सांगितलं होतं. युतीसाठी देवेंद्र फडणवीस यांनाही भेटलो होतो. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उध्दव ठाकरे यांच्यामध्ये 1 तास चर्चाही झाली होती. यानंतर युतीबाबत वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीला खासदार अरविंद सावंत आणि संजय राऊतही उपस्थित होते. यावेळी मलाही युती करायची आहे, असे ठाकरे म्हणाले. तसेच तुम्हीही युतीसाठी प्रयत्न करा, असे ठाकरे यांनी सांगितले. परंतु संजय राऊत यांची विधाने युतीमध्ये खोडा घालणारी ठरली.
अल्वा यांना पाठिंबा दिल्यानेही नाराजी
शेवाळे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी काही महिन्यांपूर्वी सांगितलं होतं की, भाजपशी युती करण्याचा मी देखील प्रयत्न करतोय, तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न सुरु ठेवा. आमचे सोर्स एकनाथ शिंदे आहेत, म्हणून उद्धव ठाकरेंच्या सांगण्यानुसार प्रयत्न सुरु केले. त्याचवेळी भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आल्यामुळे भाजपचे पक्षश्रेष्ठी नाराज झाले होते. दुसरीकडे, एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला. त्यामुळे आम्ही युतीबाबत प्रयत्न करत असताना यूपीएच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा दिला. अल्वा काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रभारी असताना त्यांनी शिवसेनेचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही, परंतु ठाकरेंच्या या निर्णयाने आम्ही नाराज झालो.
शेवाळे म्हणाले, 1 जून रोजी आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितले की, पक्षासोबत राहू. पण तेव्हा आम्ही सांगितले की, भाजपसोबत निवडणूक लढवली आहे. वचननामा मोडून राष्ट्रवादी-काँग्रेसबरोबर आघाडी केल्याचा आम्हाला त्रास होतोय. त्यावेळी संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत उपस्थित होते.
शेवाळे म्हणाले, पुन्हा बैठका झाल्या. तेव्हा पुढच्या निवडणुकीत भाजपासोबत युती करण्याचा आम्ही आग्रह धरला. पण उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून निवडणूक लढू म्हणून सांगितले. आम्ही राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला तर त्यांच्यासोबत युती करण्याचा मार्ग मोकळा होईल, असे आम्ही सांगितले.
रिस्पॉन्स नाही
कित्येकवेळा उद्धव ठाकरेंशी युतीची चर्चा केली. पण रिस्पॉन्स मिळाला नाही. या सर्व गोष्टी उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितल्या. माझ्या परीने मी युतीचा प्रयत्न केला आहे. आता तुम्ही प्रयत्न करा, असे ते म्हणाले. मी स्वतः चार-पाच खासदारांना भेटलो. फडणवीस आणि शिंदेंना भेटलो. पण ज्या गोष्टींची पूर्तता करायची होती ती केली नाही. आमच्या चार-पाच बैठका झाल्या. शेवटच्या बैठकीतही आम्ही युती करायला तयार आहोत असे सांगितले, पण मला सहकार्य मिळालं नाही. आम्ही सर्व त्यावेळी प्रयत्न करत होतो, असे शेवाळे म्हणाले.
आम्ही शिवसेनेचे खासदार
आमचा लोकसभेत वेगळा गट आहे असे नाही. आम्ही शिवसेनेचे खासदार आहोत आणि एनडीएबरोबर आहोत. शिवसेनेचे गटनेते बरोबर काम करत नाहीत, म्हणून त्यांना बदला अशी आम्ही शिवसेना नेतफत्वाकडे मागणी केली होती. त्याप्रमाणे शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी यांच्या सहीने आम्ही लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले. आता त्यांचा व्हीप सर्व खासदारांना लागू राहणार आहे, असे शेवाळे म्हणाले.









